News Flash

ठराविक दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती

जूनपासून सुरू  होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शाळा सज्ज होत असतांना पालक शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात दंग आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

शाळांकडून पालक वेठीस

शिक्षण विभागाने शाळा तसेच शैक्षणिक सस्थांना विद्यार्थी, पालकांवर शैक्षणिक साहित्य विशिष्ट एखाद्या दुकानातून खरेदी करण्याची सक्ती किंवा सूचना करू नये असे परिपत्रक काढले आहे. त्यास शिक्षण संस्थांनी केराची टोपली दाखवत ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. शाळांच्या विशिष्ट दुकानातील सक्तीमुळे पालकांना मात्र आर्थिक भरुदड बसत आहे. या घडामोडीत शिक्षण विभागाने अशी सक्ती करणाऱ्या शाळांविरुध्द पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन करत स्वत: बघ्याची भूमिका घेतली आहे. या परिस्थितीत पालकवर्ग न्यायाच्या प्रतिक्षेत आहे

जूनपासून सुरू  होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शाळा सज्ज होत असतांना पालक शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात दंग आहे. शहरातील बहुतांश शाळांनी मुलांचे शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करावे, असे पत्रक निकालासोबत पालकांच्या हाती दिले आहे. यात गणवेश, शैक्षणिक साहित्य, पादत्राणे कोठे घ्यावेत याचा तपशील देण्यात आला. पालकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ठराविक दिवस, वेळही निश्चित करण्यात आली आहे. पालकही शाळांच्या सूचनेला विरोध कसा करायचा या विचाराने या अप्रत्यक्ष नियमावलीचे पालन करत आहेत. दुसरीकडे, ज्या पुस्तकांच्या नामांकित दुकानातून वह्य़ा-पुस्तके खरेदी करायची आहेत, तेथे वह्य़ा, पुस्तकांसोबत कार्यानुभवासाठी लागणारे साहित्य, चित्रकलेचे साहित्य, वह्य़ा पुस्तकांना लावण्यात येणारे कव्हर असा संपूर्ण संच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. यासाठी पालकांना संचाच्या एकूण रकमेत काही विशेष सवलतही दिले जाते. तसेच आकर्षक भेटवस्तुचा पर्याय समोर ठेवला जातो.

काही पालक पुस्तके, रंगपेटी, कव्हर घरी असल्याचे सांगत त्या यादीतील अनावश्यक साहित्यास फाटा देत आपल्या देयकाची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा पालकांना आकर्षक भेटवस्तू, एकूण संचावरील सवलतीपासून वंचित ठेवण्यात येते.

एरवी खूप काही गंभीर घडले तरी पोलीस ठाण्याची पायरी गाठण्यास कचरणारे नागरिक मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत अधिक संवेदनशील आहेत.

शैक्षणिक वर्षांत वेगवेगळ्या प्रकारचा बोजा पडतो.

त्यातील अधिकच्या ४००-५०० रुपयांच्या खर्चासाठी पालक पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे पाऊल उचलणार नाही, याची खात्री शिक्षण विभाग, दुकानदारांना असल्याने दुकानदारी जोरात फोफावल्याचे चित्र आहे.

जुन्या पुस्तकांच्या देवाण-घेवाण

शाळांकडून शैक्षणिक साहित्याची होणारी सक्ती पाहता काही हौशी पालकांनी नवमाध्यमांवर गट करत आपल्या मुला-मुलींच्या जुन्या पुस्तकांना नीटनेटके करत ते नाममात्र दरात किंवा भेट म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यांना द्यायचे नियोजन केले. परंतु, दरवर्षी पुस्तक मंडळाकडून नियोजित अभ्यासक्रमात काही अंशी बदल होत असल्याने किंवा नव्याने एखाद्या उपक्रमशील पुस्तकांची भर पडत असल्याने सुस्थितीत असलेल्या जुन्या पुस्तकांचे करायचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे.

पालकांनी पोलिसात जावे

शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नये या सरकारी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शाळा तसेच शैक्षणिक संस्थांवर पोलीस ठाण्यात जाऊन पालकांनी तक्रार दाखल करावी. याबाबत शिक्षण विभागाकडे लेखी स्वरूपात पालकाने तक्रार करावी. निनावी पत्र वा दूरध्वनी ग्राह्य़ धरला जाणार नाही. लेखी तक्रारीची शहानिशा करून गरज पडल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यापर्यंत कारवाई होऊ शकते.

नितीन उपासनी (शिक्षणाधिकारी, महापालिका)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:42 am

Web Title: compulsory to purchase educational materials in certain shops nashik school demand
Next Stories
1 सर्वाधिक पावसाच्या इगतपुरी तालुक्यात टंचाईच्या झळा
2 औरंगाबादच्या दंगलग्रस्तांना भरपाई द्यावी – अजित पवार
3 पावसाळ्यात विमान उड्डाण
Just Now!
X