नाशिकरोड कारागृहात संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू

बंदीजनांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी नाशिकरोड कारागृहात अद्ययावत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यात तब्बल ३०० बंदीजनांनी उत्सुकता दाखविली आहे. शिक्षा भोगून झाल्यानंतर संगणकीय ज्ञानाचा उपयोग संबंधितांना स्वयंरोजगार, व्यवसाय करताना होईल. कारागृहात असे केंद्र सुरू करणारे नाशिकरोड हे देशातील पहिलेच कारागृह ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.नाशिकरोड कारागृहात संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी मुंबई येथील समता फाऊंडेशनने पुढाकार घेतला. कारागृहातील ग्रंथालयात हे केंद्र सुरू करण्यात आले. त्यासाठी ३० संगणक आणि टेबल, खुच्र्यासह प्रशिक्षकाची उपलब्धता फाऊंडेशनने केली आहे. संगणकाची दुरुस्ती, देखभालीची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांशी करार करून बंदीजनांना कामही मिळवून दिले जाणार आहे. या केंद्राच्या उद्घाटनासाठी फाऊंडेशनचे संचालक मधुसूदन अग्रवाल, पुरुषोत्तम अग्रवाल हे खास हेलिकॉप्टरने दाखल झाले.

प्रशिक्षक, तज्ज्ञ, ३० कर्मचाऱ्यांसह पोलीस उपमहानिरीक्षक (औरंगाबाद) दिलीप झळके, अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ अधिकारी पल्लवी कदम, यशवंत फड आदी उपस्थित होते.

नाशिकरोड कारागृहात खून, जन्मठेप, बॉम्बस्फोट आदी विविध गुन्ह्य़ातील तीन हजारहून अधिक बंदी असून त्यामध्ये निम्मे शिक्षा सुनावलेले पक्के कैदी आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन शिक्षण, प्रशिक्षण उपक्रम राबविते. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर स्वयंरोजगार, व्यवसाय करता यावा, यासाठी या केंद्रात कैद्यांना टॅली, एमएस ऑफिस, मराठी-इंग्रजी डीटीपी आदींचे प्रशिक्षण दिले जाईल. कैद्यासाठी दुचाकी दुरुस्ती, आयटीआय, शिवणकाम आदी प्रशिक्षण दिले जाते. शैक्षणिक पदवी, पदविका घेण्याची सोय करून दिली जाते. त्यात संगणकीय प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.