अनिकेत साठे

कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर गडगडलेले भाव पुन्हा स्थिरस्थावर होत असताना दुसरीकडे अकस्मात ओढावलेल्या बंदीत अडकून सुटलेल्या कांद्याच्या परदेश गमनाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. व्यापारी, निर्यातदारांच्या मते बंदरासह रस्ते मार्गात अडकून पडल्याने कांदा मोठय़ा प्रमाणात खराब झाला.

बराचसा माल परत मागवून निम्म्या किमतीत विकावा लागला. परंतु, शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार तसे काहीच घडलेले नाही. बंदरात अन् रस्ते मार्गातील सर्व माल परदेशी बाजारपेठेत रवाना झाला. भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांनी हे षडयंत्र रचल्याचा आरोप होत आहे.

निर्यातबंदीच्या कचाटय़ात किती कांदा सापडला, याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली होती. बंदरात ४०० कंटेनर अडकले होते. बांग्लादेशला मार्गस्थ झालेली शेकडो वाहने रस्त्यात अडकून पडली होती. निर्यातबंदीच्या निर्णयाचे संतप्त पडसाद उमटले. नाशिकसह राज्यातील अनेक भागात आंदोलने झाली. भाजपचा सहयोगी असलेल्या माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालीला रयत क्रांती संघटनेने कांदा उत्पादक भागात आंदोलन केले होते.

किमान बंदरासह इतरत्र अडकलेल्या मालाच्या निर्यातीला परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हा मुद्दा लावून धरला. या घडामोडीनंतर केंद्राने अडकलेल्या मालाच्या निर्यातीला तात्पुरत्या स्वरूपात हिरवा कंदील दाखविला. निर्यातबंदीमुळे गडगडलेला कांदा देशांतर्गत मागणी वाढल्याने आता पुन्हा प्रति क्विंटलला साडेतीन हजार रुपयांपर्यंत वधारला आहे.

निर्यातीला तात्पुरती मुभा मिळाल्यानंतर किती माल परदेशात जाऊ शकला, याबद्दल मतभिन्नता आहे. कोणतीही सवड न देता लादलेली निर्यात बंदी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांसाठी मारक ठरल्याचे नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी सांगितले.

अकस्मात लादलेल्या निर्यात बंदीमुळे बंदरासह रस्ते मार्गात अडकलेला कांदा मोठय़ा प्रमाणात खराब झाला. परवानगी मिळूनही बहुतांश माल परदेशात जाऊ शकला नाही. तो परत मागवावा लागला. १०० कोटीच्या कांद्याची निम्म्या म्हणजे अवघ्या ५० कोटी रुपयांमध्ये विक्री करावी लागली.

-सोहनलाल भंडारी  अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटना

निर्यातबंदीच्या निर्णयानंतर केवळ दोन, तीन दिवस कांदा अडकला होता. परदेशात माल पाठविला जातो, तेव्हा प्रवासाचा कालावधी वगळता किमान १५ ते २० दिवस तो टिकेल, याचा विचार केला जातो. शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा सहा महिने टिकतो. माल खराब झाल्याची ओरड हे भाव पाडण्याचे षडयंत्र आहे.

आमदार, सदाभाऊ खोत अध्यक्ष, रयत क्रांती संघटना