News Flash

अंतर्गत मूल्यमापन नसल्यास गुणपत्रक कसे करणार?

इयत्ता ९ वी, ११ वीच्या शिक्षकांमध्ये संभ्रम

इयत्ता ९ वी, ११ वीच्या शिक्षकांमध्ये संभ्रम

नाशिक : राज्यात करोना आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे पहिली ते आठवी आणि नववी, ११वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने परिपत्रक काढून मूल्यमापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले आहे. नववी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांंचे अंतर्गत गुणांच्या आधारे गुणदान करावे आणि गुणदान कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. परंतु, ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही; त्यांनी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक कसे तयार करावे, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.

ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापन करून गुणदान केलेले आहे. त्यांनी आकारिक मूल्यमापनाच्या गुणानुसार विद्यार्थ्यांंचे गुणपत्रक तयार करावे. तसेच पहिली ते आठवीच्या ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापनदेखील केलेले नाही. अशा विद्यार्थ्यांंच्या गुणपत्रकावर सर्वाना शिक्षण हक्क कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नोत असा शेरा देण्याविषयी सूचित केलेले आहे.

दुसरीकडे राज्य शासनाने नववी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांंचे अंतर्गत गुणांच्या आधारे गुणदान करावे, याविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार गुणपत्रक तयार करण्यास सुचविण्यात आले आहे. परंतु, ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही. त्यांच्यात गुणपत्रक तयार करण्याविषयी संभ्रमावस्था आहे. कारण सर्वाना शिक्षण हक्क कायदा आठवीपर्यंत लागू आहे.

कोणत्याही विद्यार्थ्यांस नापास करू नये आणि पुन्हा नव्याने ऑनलाइन अथवा ऑफलाइन मूल्यमापन करू नये, असे सूचित केलेले आहे. त्यामुळे अजूनच गोंधळ निर्माण झालेला आहे. नववी आणि ११ वी मूल्यमापनाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

ज्या शाळांनी नववी आणि ११ वीचे अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही. त्यांना किमान २० गुणांचे ऑनलाईन मूल्यमापन करण्याची परवानगी दिल्यास त्यांचे १०० गुणांमध्ये रुपांतर करता येईल. किंवा सरसकट या वर्गाच्या विद्यार्थ्यांंना सर्वाना शिक्षण हक्कनुसार शेरा देऊन गुणपत्रक देण्याची परवानगी द्यावी म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा संभ्रम राहणार नाही, असे मत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी मांडले.

शासनाने शाळा सुरू करतांना परिपत्रकानुसार मागर्दर्शक सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊ नये, वही, पेन, पेन्सिल यासह इतर साहित्याची देवाणघेवाण करू नये, स्वाध्याय वह्य जमा करू नये, कोणत्याही परीक्षा घेऊ नये, असे सूचित करण्यात आले होते. परिणामी बहुतेक शाळांनी फक्त अध्यापन केले. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्य़ात शाळा जानेवारीत उशीरा सुरु झाल्या. आणि मार्चमध्ये लगेच बंद करण्यात आल्या. या कालावधीत शिक्षकांना अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांंची मानसिकता स्थिर करावी लागली. त्यामुळे अतर्गत मूल्यमापन

करता आले नाही. परिणामी मूल्यमापनाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निफाड तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष पी. के. धुळे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:46 am

Web Title: confusion among 9th and 11th class teachers over internal evaluation zws 70
Next Stories
1 नाशिक विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी ४६ दिवसांवर
2 करोनाविरोधातील लढय़ासाठी खासगी संस्थांनी पुढे यावे!
3 नाशिकमध्ये करोना परिस्थिती हाताबाहेर
Just Now!
X