• तहकूब विषय परस्पर मंजुरीच्या आरोपावरून रणकंदन
  • हंडा फोडल्यामुळे भाजप नगरसेविकांचा रुद्रावतार

तहकूब ठेवलेले विषय पत्रिकेत समाविष्ट न केल्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेसह इतर पक्षीयांमध्ये रणकंदन झाले. दरम्यान पाणीपुरवठय़ाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एका सदस्याने सभागृहात फोडलेल्या मातीच्या हंडय़ाचे तुकडे भाजपच्या नगरसेविकेस लागल्याचे निमित्त होऊन गोंधळास वेगळे वळण लागले. भाजपच्या सर्व नगरसेविकांनी या कृतीचा निषेध केला. तर सभागृहाचे कामकाज चालू नये म्हणून भाजपने हा डाव रचल्याचे सांगत तहकूब विषय परस्पर मंजूर केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला. आंदोलनावेळी अनवधानाने ती कृती घडल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्यांसह हंडा फोडणाऱ्या नगरसेवकाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला.

कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, मनसेचे सलीम शेख, सुधाकर बडगुजर आदींनी भाजप मनमानी कारभार करत आहे, तहकूब विषय परस्पर मंजूर करत असल्याने सभेची गरजच काय, असा जाब विचारत महापौरांची कोंडी केली. विषयपत्रिकेवर तहकूब विषय नाहीत. कोणते विषय मंजूर झाले, कोणते तहकूब याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. त्यांच्या सुरात भाजपच्या काही सदस्यांनी सूर मिसळला. दिनकर आढाव यांनी तहकूब विषय पत्रिकेत का आले नाहीत, ही विचारणा रास्त असल्याचे सांगितले. नगर सचिवांची ती चूक असून पुढील वेळी हे विषय घ्यावेत, असे त्यांनी सांगताच विरोधक भडकले. महापौरांनी सांगितल्यानुसार नगर सचिव काम करतो. त्यांच्यावर खापर फोडू नये, असे सांगत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. स्थायी सभापती उद्धव निमसे यांनी विरोधकांच्या मुद्दय़ाचे           समर्थन करत शांततेसाठी प्रयत्न केला. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू होता.

नाशिकरोड विभागातील सेनेचे नगरसेवक सुनील गोडसे हे मागण्यांचा फलक परिधान करून सभागृहात आले होते. आपल्या प्रभागातील जयभवानी रस्ता परिसरातील पाण्याची समस्या त्यांना मांडायची होती. वारंवार विचारणा करूनही महापौर बोलण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेले गोडसे रिकामा हंडा घेऊन महापौरांच्या व्यासपीठाकडे निघाले. जाताना मोकळ्या जागेत त्यांनी हा हंडा आपटला. त्याचे तुकडे आजूबाजूला बसलेल्या काही नगरसेविकांना लागले. त्यात वर्षां भालेराव यांचाही समावेश होता. यामुळे भाजप नगरसेविका आक्रमक झाल्या. महापौरांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. संबंधित नगरसेवकाने माफी मागावी, त्यास निलंबित करावे, अशा मागण्या करत त्यांनी घोषणाबाजी केली. गोंधळात सभेचे कामकाज सुरू झाले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बोलू न दिल्याने गोडसेंच्या भावना अनावर होऊन उपरोक्त प्रकार अनवधानाने घडल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली. वर्षां भालेराव यांनी नगरसेवकाच्या मडके फोडण्याच्या कृतीचे विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप केल्यावर पुन्हा वादाला तोंड फुटले. हंडाहातातून निसटला. कोणाला इजा झाली असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे गोडसे यांनी सांगितल्यावर विषयावर पडदा पडला.

सभा नक्की कोणती?

सभागृहातील गोंधळ कमी करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी वारंवार हस्तक्षेप करून शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, सदस्यांनी त्यांना दाद दिली नाही. तहकूब विषय पत्रिकेत नसल्यामागे त्यांनी ही स्मार्ट सिटी कंपनीशी निगडित विशेष सर्वसाधारण सभा असल्याचे सांगितले. भाजपचे स्थायी सभापती किंवा इतर सदस्यांनी देखील ही विशेष सभा असल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांच्या दाव्यातील हवा विरोधकांनी काढली. विषयपत्रिकेवर ही मासिक सर्वसाधारण सभा असल्याची नोंद असल्याकडे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी लक्ष वेधले. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी ही सभा असेल तर सर्व कामांवर चचा करू द्यावी, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी केली.

महापौरांची कोंडी

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यासमोर महापौरांना नमते घ्यावे लागले. तहकूब विषयांवरून विरोधकांनी कोंडी केल्यामुळे त्यांनी ते विषय लगेच घेऊन टाकण्याचे जाहीर केले. पण तसे घेता येत नसल्याचे भाजपच्या काही सदस्यांनी सांगितल्यावर ते विषय बाजूला पडले. गोंधळाचे चित्रीकरण करणाऱ्या छायाचित्रकारांना महापौरांनी तंबी दिली. व्यासपीठावरून बाजूला न झाल्यास प्रेक्षक सज्जात पाठविण्याचा इशारा दिला. महापौरांच्या मदतीला भाजपचे एक-दोन वगळता कोणी सदस्य आले नाहीत. जे आले त्यांनी विरोधकांची मागणी रास्त ठरवली.