22 July 2019

News Flash

Bharat Bandh : बंदला संमिश्र प्रतिसाद

बस वाहतूक बंद, प्रवाशांचे हाल; रिक्षाचालकांकडून लूट

नाशिक शहरात सर्वपक्षीय विरोधी पक्षातील नेत्यांनी बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काढलेली फेरी.

बस वाहतूक बंद, प्रवाशांचे हाल; रिक्षाचालकांकडून लूट

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदला शहरासह ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी काँग्रेस, मनसे, डाव्या आघाडीसह इतर पक्षांनी संयुक्तपणे आंदोलन करत शहर बस वाहतुकीसह बाहेरगावी जाणारी सेवा बंद पाडली. रिक्षा वाहतूक रोखण्याकरिता शालिमार चौकात कार्यकर्त्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला.

सर्वपक्षीय विरोधी नेत्यांनी काढलेल्या फेरीमुळे मुख्य बाजारपेठेतील व्यवहार थंडावले. परंतु, आसपासच्या भागात दैनंदिन व्यवहार, जनजीवन सुरळीत होते. बस सेवा बंद असल्याने रिक्षाचालकांनी अवाच्यासव्वा भाडे आकारात नागरिकांची अक्षरश: लूट केली. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. बंदला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने याच दिवशी करवाढीच्या मुद्दय़ावरून महापालिकेवर मोर्चा काढला. परिणामी, काँग्रेसला मित्रपक्षाची अपेक्षित रसद मिळाली नाही. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेत्यांनी बंद ऐवजी मोर्चा यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे पाहावयास मिळाले.

पेट्रोलचे भाव ८८ रुपये लिटपर्यंत पोहोचले असून डिझेलच्या दरात तशीच वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा प्रचंड बोजा पडल्याचा आरोप करत बंदची हाक देणाऱ्या काँग्रेसला शहर, ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेचा परिसर वगळता इतरत्र बंदचा फारसा प्रभाव जाणवला नाही. बहुतांश ठिकाणी दुकाने, दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. सकाळी सहा वाजता काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादीसह बंदला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांचे नेते पंचवटीतील राज्य परिवहनच्या प्रमुख आगारासमोर जमले. आंदोलनाद्वारे त्यांनी शहर बस वाहतुकीसह बाहेरगावची बससेवा बंद ठेवण्याची मागणी केली. त्यास महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले. आजवरच्या आंदोलनात एसटी प्रामुख्याने लक्ष झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे महामंडळाने बस सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नोकरदार, बाहेरगावहून आलेल्या प्रवाशांना बसला.

रिक्षा वाहतूक सुरू होती. बससेवा नसल्याने संबंधितांनी प्रवाशांची लुबाडणूक करण्याचे धोरण ठेवले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने महाविद्यालयांच्या उपस्थितीवर विपरीत परिणाम झाला. सकाळच्या सत्रात शाळांमध्ये दिसणारी गर्दी दुपारच्या सत्रात ओसरली.

बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवला होता. बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुपारी शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरी काढली. मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा आदी भागात दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यास आले. फेरीत आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, मनसेचे अनिल मटाले, माकपचे डी. एल. कराड आदी नेते सहभागी झाले. सिडको, नाशिकरोड परिसरात मोर्चा काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ज्या ज्या भागात फेरी मार्गस्थ झाली, तेथील दुकाने बंद झाली. काही भागात बंदचा कोणताही मागमूस नव्हता. रिक्षा वाहतूक बंद पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी शालिमार चौकात टायर जाळण्याचा प्रयत्न केला. असा काही अपवाद वगळता सर्वत्र बंद शांततेत पार पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शहर आणि ग्रामीण भागातील बस वाहतूक बंद राहिल्याने महामंडळाला कोटय़वधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

मनमाड, कळवण, सुरगाण्यात प्रभाव

इंधन दरवाढीने त्रासलेल्या नागरिकांसह व्यापारी वर्ग सहभागी झाल्यामुळे मनमाड, सुरगाणा, कळवण येथे बंद कडकडीत राहिला. सिन्नरसह इतरत्र फारसा परिणाम जाणवला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी मोर्चा काढून दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. राष्ट्रवादी, मनसे, पीपल्स रिपब्लिकन पक्षांनी पाठिंबा दिल्याने मनमाडमध्ये बंदचा चांगलाच प्रभाव जाणवला. मोदी हटाव, देश बचाओ, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा आदी घोषणा देऊन ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. रिक्षा, पेट्रोल पंप आदींसह काही प्रमुख अत्यावश्यक सेवा बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाट वाढ करून सामान्य नागरिकांना हैराण केले आहे.  सर्वच आघाडय़ांवर हे सरकार कुचकामी ठरल्याचा आरोप करण्यात आला.

First Published on September 11, 2018 1:27 am

Web Title: congress called bharat bandh rising fuel price 6