आम्ही आधी गुंडाना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारु, असे भाजपचे मंत्री म्हणतात. मात्र जे स्वतःच नाही सुधारले ते गुंडांना काय सुधारणार, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण नाशिकच्या वडाळा भागातील सहभागी झाले होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपसह शिवसेना आणि मनसे यांचावर जोरदार टीका केली.

‘नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. आर्थिक व्यवहार ठप्प झाले. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, आणि आपल्याकडे दारिद्य अशी परिस्थिती निर्माण झाली’ अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ‘शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर राजीनामे खिशात घेऊन फिरतात. मात्र ही मंडळी राजीनामा द्यावा लागेल म्हणून आत जात नाहीत, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. ‘मागील चार पाच वर्षांची परिस्थिती जर पाहिली तर मनसे, शिवसेना, भाजप या पक्षांना नाशिकशी काहीही देणेघेणे नाही. आम्ही दोघे भाऊ भाऊ, सगळे मिळून खाऊ असाच यांचा कार्यक्रम चालू आहे,’ असा आरोप अशोक चव्हाण यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केला.

‘शिवसेनेची मंडळी हातात भगवा घेऊन हफ्ते वसुली करतात, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र गृहखाते असलेले मुख्यमंत्र्यांकडे असताना ते अशी वसुली कशी काय होऊ देतात,’ असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला. ‘भाजपला औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र ही शिवसेना आणि भाजपची मिलीभगत आहे. तू हसल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. ज्यांना भाजपाला मतदान करायचे नाही, त्यांनी शिवसेनेला मतदान करावे आणि ज्यांना शिवेसेनेला मतदान करायचे नाही, त्यांनी भाजपला मतदान करावे. यासाठी हे या दोन पक्षांचे षडयंत्र आहे. दोन्ही पक्ष लोकांना मूर्ख बनवत आहेत’, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

‘भाजपचे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्रातही आहे. पण नाशिकमध्ये यांनी काय केले? या पक्षाला सत्ता देण्याचा निर्णय चुकल्याची भावना आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. आता लोकच एकही भूल कमल का फूल असे म्हणतात. ही परिस्थिती देशात आणि राज्यातही आहे’, असे म्हणत अशोक चव्हाणांनी भाजपवर जोरदार टीका केली.