जल्लोषामुळे वाहतूक कोंडीत भर

नाशिक : राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याचा आनंदोत्सव बुधवारी येथील सेना कार्यालयासमोर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथमच एकत्रितपणे साजरा केला. सेनेच्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रमाण कमी होते. महापौर निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग फसल्याने त्याचे प्रतिबिंब आनंदोत्सवावर पडल्याचे दिसून आले.

शालिमार येथे ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी झाली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे शालिमारकडून सीबीएस आणि टिळक पथकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे मध्यवर्ती भागात आधीच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सत्ताधारी पक्षांच्या जल्लोषामुळे त्यात आणखी भर पडली. राज्यात नव्या आघाडीचे समीकरण जुळले असले तरी अलीकडेच स्थानिक पातळीवर महापौर निवडणुकीत हा प्रयोग फसला होता. काँग्रेसच्या असहकार्यामुळे सेनेला अखेरच्या क्षणी माघार घ्यावी लागली होती. त्याचे मळभ आनंदोत्सवावर राहिल्याचे जाणवले.

शिवसेनेच्यावतीने शालिमार येथे दुपारी साडेबारा वाजता आनंदोत्सवाचे आयोजन केले होते. सेना कार्यालयातून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून निमंत्रण दिले गेले. या माध्यमातून स्थानिक पातळीवर आघाडीचे शक्तिप्रदर्शन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सेना कार्यालयासमोरील जल्लोषात काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिसले  नाहीत. काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, स्वप्निल पाटील, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक अन् सध्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी अर्जुन टिळे, शोभा मगर असे काही पदाधिकारी होते.

या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईत असल्याने आनंदोत्सवात सहभागी होता आले नसल्याचे सांगितले. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असल्याचे त्यांनी सूचित केले.

शिवसेनेचे महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बिडवे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी सेना आणि राष्ट्रवादीचे झेंडे एकत्र पाहायला मिळाले. काँग्रेसचे झेंडे नव्हते. गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास शिवसैनिक मोठय़ा संख्येने जाणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

सत्ताधारी पक्षाचा जल्लोष वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला. स्मार्ट रस्ता कामामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. यामुळे आधीच ठिकठिकाणी कोंडी होत असताना जल्लोषामुळे त्यात अधिकच भर पडली. जवळपास १५ मिनिटे कार्यकर्ते रस्त्यावर होते. वाहनधारकांना मार्गस्थ होण्यात अडचणी येत होत्या. परंतु उत्साही पदाधिकाऱ्यांना बाजूला करणे पोलिसांना अशक्य झाले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अंतर

काँग्रेसचे महापालिकेत सहा नगरसेवक आहेत. त्यातील डॉ. हेमलता पाटील वगळता कोणी फिरकले नाही. महापौर निवडणुकीत सेना-काँग्रेसचे बिनसले होते. काँग्रेसचे पदाधिकारी एकाच वेळी शिवसेना आणि भाजपशी वाटाघाटी करत असल्याचा आरोप झाला होता. काँग्रेसचे असहकार्य, मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने सेनेला निवडणुकीतून सेनेला माघार घेण्याची नामुष्की ओढवली होती.