*   महापालिका मतदानासाठी दुपापर्यंत निरुत्साह; ड्रोन कॅमेरांची मदत  *  मालेगाव महापालिका निवडणूक

सकाळपासून किरकोळ अपवाद वगळता शांततेत सुरू असलेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाला दुपारी एटीटी हायस्कूलच्या केंद्रावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे गालबोट लागले. या मारहाणीत दोन जण जखमी झाले असून जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.  संवेदनशील परिसरात ड्रोन कॅमेरांच्या मदतीने नजर ठेवण्यात आली.

८४ पैकी एक जागा अविरोध झाल्याने २१ प्रभागांतील ८३ जागांसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी साडेसात वाजता वेगवेगळ्या भागांतील ११५ इमारतींमध्ये एकूण ५१६ केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. गेल्या वेळी ६३ टक्के मतदान झाले होते. या वेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली. सकाळपासून संथपणे मतदान सुरू होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४४.६७ पर्यंत पोहोचली. अपंगांना मतदान करता यावे म्हणून खास व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली. त्याचा अनेक अपंगांनी लाभ घेतला. १०० टक्के मतदारांना आशा व लिंक वर्करच्या माध्यमातून मतदान चिठ्ठी देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न होते. तथापि, त्यानंतरही मतदारांना केंद्र शोधण्यात अडचणी आल्या, तर त्याचे निराकरण करण्यासाठी दहा ठिकाणी मतदार साहाय्यता केंद्राची व्यवस्था करण्यात आली.

या केंद्रांचीही मतदारांना मदत झाली. या स्थितीत दुपापर्यंत मतदारांचा निरुत्साह दिसून आल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल की नाही याबद्दल संभ्रम होता. काही भागांत गैरसोयीचे केंद्र असल्याने मतदारांनी मतदान करणे टाळले. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी मतदार बाहेर पडले नाहीत. हे मतदार सायंकाळी मतदानास येतील, अशी आशा निवडणूक यंत्रणा व उमेदवार बाळगून होते. उमेदवारांनी आपल्या हक्काचे मतदान होईल याकडे प्राधान्याने लक्ष दिले.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

शांततेत सुरू असलेल्या मतदानास दुपारी गालबोट लागले. एटीटी हायस्कूलच्या केंद्रावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या वादामागील कारणाची स्पष्टता झाली नाही. हाणामारीत काँग्रेसचे कार्यकर्ते इरफान अहमद मो. आबिद आणि अब्दुल लतीफ अशी नावे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या हाणामारीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि लोकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्कबजावता यावा म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

चार मतांचा अधिकार व गोंधळ

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार होता. त्यासाठी जागेच्या प्रवर्गानुसार पांढरा, फिकट गुलाबी, फिकट पिवळा व फिकट निळा अशा वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका देण्यात आल्या होत्या. नोटाचाही पर्याय समाविष्ट होता. एकाहून अधिक मते देण्यामुळे मतदारांचा गोंधळ उडत असल्याचे चित्र दिसत होते.