मालेगाव : केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीसाठी लागू केलेल्या सक्तीच्या ‘फास्टॅग’ प्रणालीला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. अशा प्रकारची ही सक्ती चुकीची आणि अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते प्रसाद हिरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथील प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे केली आहे.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय)ने देशभरातील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रत्येक वाहनचालकास आपल्या वाहनावर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. ‘फास्टॅग’च्या अचानक सुरू केलेल्या वापरामुळे टोलवसुलीकरिता टोलनाक्यांवर मोठा गोंधळ निर्माण झाला असून ऑनलाइन प्रणालीचा सर्वदूर फज्जा उडाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

लोकांचे मत विचारात न घेता १ डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात कुठलीही जनजागृती करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात ‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने चांदवड, पिंपळगाव आणि घोटी या नाक्यांवर टोल भरणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने धुळे -नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार रोज घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या गोंधळामुळे केंद्र सरकारने वाहनांना ‘फास्टॅग’ करण्याकरिता १५ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी तशी सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

‘फास्टॅग’प्रणालीची सक्ती करू नये, टोलनाक्यांवर रोखीने टोल भरण्यासाठी सध्या सुरू असलेली एकाच लेनची व्यवस्था गैरसोयीची असल्याने या लेनची संख्या वाढवावी, रोखीने टोल भरणाऱ्यांना दुप्पट टोल द्यावा लागणे हे बेकायदेशीर असल्याने दुप्पट टोल वसुली थांबविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.