कार्यकर्त्यांची वानवा असलेल्या बैठकीत निर्णय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना करण्यासाठी काँग्रेसने आयोजिलेल्या बैठकीत इच्छुकांसह कार्यकर्त्यांची वानवा होती. जिल्ह्य़ातील एकंदर स्थितीमुळे वाहतूक बंद असल्याचे कारण स्थानिक पुढाऱ्यांनी पुढे केले;

परंतु पक्षांतर्गत बेबनाव आणि संवादाचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आदींची वानवा असल्याने वरिष्ठ नेत्यांनी घाईघाईत बैठकीचा सोपस्कार पार पाडत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले.

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांशी चर्चा करत पक्षाची सद्य:स्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने बुधवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक पार पडली. या वेळी पक्षातील गटबाजी, अंतर्गत राजकारण, पक्षीय बलाबल यासह अन्य मुद्दय़ांवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. भाई जगताप यांनी मार्गदर्शन केले. पुढील वर्षी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर पक्षातील सदस्यांना गळती लागली आहे. या अनुषंगाने चर्चा झाली. विद्यमान सदस्य, नगरसेवकांशी संवाद साधत जिल्ह्य़ातील पक्षाची स्थिती समजावून घेत मंथन केले.

आपण या ठिकाणी का जमलो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आगामी काळात स्वबळावर निवडणूक लढवायची की राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची यावर प्रत्येकाने मत नोंदवावे, असे आवाहन आ. जगताप यांनी केले. पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल, यावर पुढील काळात भर देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या पक्षाच्या या बैठकीकडे पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांनी पाठ फिरवल्याने बैठकीचा फार्स केवळ आटोपता घ्यावा लागला. त्र्यंबकेश्वर येथील घटनेमुळे काही भागांत वाहतूक बंद आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते पोहोचू शकले नसल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. पक्षातील अंतर्गत राजकारण आणि संवादाचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. बैठकीस आ. निर्मला गावीत, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कार्यशैलीमुळे स्वबळावर

पक्ष बैठक पूर्वनियोजित होती. पक्ष निरीक्षक म्हणून माझ्यावर जिल्ह्य़ाची जबाबदारी आहे. आतापर्यंत मित्रपक्षांकडून निवडणुकीच्या काळात शेवटपर्यंत आघाडीबाबत अधांतरी ठेवण्यात आले. नाशिकमध्ये हा धोका अधिक झाला. त्या पाश्र्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाईल. नाशिक जिल्ह्य़ात सहा नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीने आमची चर्चा झाली. आरक्षणाचा आमच्यावर परिणाम नाही, कारण ते दर १० वर्षांनी बदलत असते. सत्ताधारी पक्षांकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. प्रभाग किंवा वॉर्ड बदलला तरी मतदाराचे मत, त्याचा रोष तोच आहे. जनता आमच्या सोबत आहे. – आ. भाई जगताप (पक्ष निरीक्षक)