सेनेला दोन, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक समिती

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर चारही विषय समिती सभापतिपदांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने वर्चस्व प्राप्त करीत प्रयोग पुन्हा यशस्वी करून दाखविला. सेनेला दोन, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका समितीचे सभापतिपद मिळाले.

गेल्या वेळी भाजपच्या खेळीमुळे विषय समित्यांमध्ये सेनेला स्थान मिळाले नव्हते. या वेळी सेनेने भाजपला कुठेही स्थान मिळणार नाही याची काळजी घेतली. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना पराभूत केले. दोन समित्यांचे सभापती अधिकृतपणे जाहीर झाले असले तरी दोन समित्यांचे वाटप होणे बाकी आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ मिळाल्याने जिल्हा परिषदेवर भगवा कायम राखण्यात सेनेला यश मिळाले. अध्यक्षपदी सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली होती. तीनही पक्ष एकत्र आल्याने १५ संख्याबळ असणाऱ्या भाजपवर माघार घेण्याची नामुष्की ओढावली. या घटनाक्रमाने चार विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडेल, असा अंदाज व्यक्त झाला. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघार घेणाऱ्या भाजपने विषय समित्यांची निवडणूक लढवली. विशेष सभेत चार विषय समिती सभापतिपदासाठी निवडणूक झाली.

महिला बालकल्याण सभापतिपदी काँग्रेसच्या अश्विनी आहेर यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या सीमंतिनी कोकाटे यांना पराभूत केले. समाजकल्याण समितीच्या सभापतिपदी सेनेच्या सुशीला मेंगाळ विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या आशा जगताप यांना पराभूत केले. उर्वरित शिक्षण-आरोग्य तसेच अर्थ-बांधकाम समितींच्या सभापतिपदासाठी निवडणूक झाली असली तरी त्यांचे वाटप अद्याप झालेले नाही. या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा दराडे आणि राष्ट्रवादीचे संजय बनकर विजयी झाले.

त्यांनी भाजपच्या अनुक्रमे लता बच्छाव आणि आत्माराम कुंभार्डे यांना पराभूत केले. बनकर हे येवल्याचे आहेत. त्यांच्यावर कोणत्या समितीची जबाबदारी सोपविली जाते, याकडे सर्वाचे लक्ष आहे. शिक्षण-आरोग्य समिती दराडे यांच्याकडे तर अर्थ-बांधकामच्या सभापतिपदाची धुरा बनकर यांच्याकडे सोपविली जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

विषय समित्यांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होते. गेल्या वेळी काँग्रेसचे दोन सदस्य फुटल्याने सेनेला स्थान मिळाले नव्हते. भाजपच्या मनीषा पवार यांना अर्थ-बांधकाम समितीचे सभापतिपद मिळाले. उर्वरित दोन समित्या राष्ट्रवादी, तर एक काँग्रेसच्या सदस्याला मिळाली होती. या वेळी काँग्रेसला समिती देण्यास सेना, राष्ट्रवादी उत्सुक नव्हते; परंतु रात्री उशिरा झालेल्या बैठकीत अखेर एका समितीचे सभापतिपद देण्यास सेना, राष्ट्रवादीने संमती दर्शविली. सेनेला दोन, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाटय़ाला प्रत्येकी एक समिती आली. मतदानात महाआघाडीच्या काहींना ५१ तर काहींना ५२ मते मिळाली.