जागरूक ग्राहकामुळे प्रकार उघडकीस
‘सवलतींचा पाऊस आणि आकर्षक किमती’ अशी जाहिरात करून बडय़ा शॉपिंग मॉलकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार जेलरोड येथील जागरुक ग्राहकाने उघड केला आहे. कंपन्यांकडून मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंची सर्रास विक्री केली जाते तसेच कंपनीने दिलेली सवलत मॉलधारक ग्राहकास देत नसल्याची तक्रार त्यांनी केली. नाशिकरोडच्या बिग बझारमध्ये खरेदी करताना हा अनुभव आल्यावर तक्रार करूनही व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. नुकसानभरपाई न मिळाल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जेलरोड येथे वास्तव्यास असणाऱ्या केरू खाडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. खाडे हे नियमितपणे बिग बझारमधून खरेदी करतात. १ एप्रिल रोजी नाशिकरोडच्या बिग बझारमध्ये त्यांनी १५५१ रुपयांची खरेदी केली. बिलात लावलेली किंमत आणि वस्तूंच्या किमती यांची पडताळणी केली असताना धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. पारले जी कंपनीच्या बिस्किट पुडय़ावर २० रुपये छापील किमतीवर दोन रुपये सवलत असे स्पष्टपणे नमूद आहे. परंतु, बिग बझारने बिलात ही रक्कम पूर्ण २० रुपये धरली. म्हणजे दोन रुपयांची सवलत ग्राहकास दिली नाही. एका पावडरच्या डब्यावर क्रिम मोफत होती. पावडरची पूर्ण रक्कम घेऊनही कंपनीने म्हटल्याप्रमाणे मोफत क्रिम दिली नाही. जे हार्पिक खरेदी केले, त्यावर ‘मोफत’ असे लिहिले आहे. म्हणजे, कोणत्या तरी वस्तूच्या खरेदीवर ते मोफत असावे, असा अंदाज आहे. परंतु बिलात त्याचे ७२ रुपये वसूल करण्यात आले. वेगवेगळ्या उत्पादनावर या पद्धतीने लुबाडणूक झाल्याचे लक्षात आल्यावर खाडे यांनी व्यवस्थापनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन तीन वेळा संपर्क साधूनही त्यांनी टाळाटाळ करत भेट दिली नाही. या प्रकरणी नुकसानभरपाई न मिळाल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागणार असल्याचे खाडे यांनी सांगितले.