News Flash

संरक्षित तलावात मत्स्यपालन ठेका देण्याचा घाट

विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : पिण्याच्या पाण्यासाठी संरक्षित असलेल्या मालेगाव महापालिकेच्या तळवाडे येथील साठवण तलावात मत्स्यपालन ठेका देण्याचा घाट घालण्यात आला असून या ठेक्याला विरोध दर्शविल्यानेच पालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी आघाडीने सुरु केला आहे. लोकांच्या जीवितास होणारा संभाव्य धोका लक्षात घेता मत्स्यपालन ठेक्यास विरोध करण्याचे प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यास अशाप्रकारे बदलीची शिक्षा देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मालेगाव शहरासाठी गिरणा धरण तसेच तालुक्यातील तळवाडे येथील साठवण तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी गिरणा धरणातून ९०० तर चणकापूर धरणातून १४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मंजूर आहे. वर्षांला चार अशा आवर्तन पद्धतीने चणकापूर धरणातून कालव्याद्वारे तळवाडे साठवण तलावात पाण्याची साठवणूक केली जाते. बाष्पीभवन आणि अन्य कारणांमुळे ८७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तळवाडे साठवण तलाव भरण्यासाठी चणकापूर धरणातून प्रत्यक्षात एका आवर्तनासाठी ३५० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागते. चणकापूर धरण ते साठवण बंधारा आणि तेथून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणारे हे पाणी गुरुत्वाकर्षण पद्धतीने येते. गिरणा धरणातून येणारे पाणी मात्र उपसा करून घ्यावे लागत असल्याने विजेच्या खर्चाचा मोठा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडत असतो.

मार्च महिन्यात महापालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मत्स्यपालनाचा ठेका देण्याचा वादग्रस्त ठराव मंजूर झाला असल्याचे सांगण्यात येते. या ठरावानुसार ठेका देण्याची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव संबंधित पाणी पुरवठा विभागाने तत्कालीन उपायुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे पाठवला होता. पिण्याच्या पाण्यासाठी संरक्षित असलेल्या तलावात मासेमारी करणे, लोकांच्या जीविताशी खेळण्यासारखे असल्याने कापडणीस यांनी या ठरावास विरोध करुन तो विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्याची शिफारस केली.

गिरणा धरणात देण्यात आलेल्या मत्स्यपालन ठेक्यामुळे लोकांच्या आरोग्यास बाधा उत्पन्न होऊ  शकेल, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा थांबविण्याची नामुष्की काही दिवसांपूर्वी महापालिकेवर आली होती. गिरणा धरणातील पाणीपुरवठा करणारम्य़ा उद्भव विहिरीलगत मोठय़ा प्रमाणावर मृत माशांचा खच त्यावेळी आढळून आला होता. मत्स्यपालन व्यवसायात मासे गोळा करतांना रासायनिक प्रक्रिया केली जाते. असाच विषप्रयोग झाल्यामुळे हे मासे मृत झाले की काय, अशी शंका त्यावेळी उपस्थित झाली होती. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या मार्च महिन्यात मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, महापालिका आयुक्त व संबंधित ठेकेदार यांची मंत्रालयात बैठक देखील बोलावली होती.

गिरणा हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. त्या तुलनेत तळवाडे येथे लहान साठवण तलाव आहे. गिरणासारख्या महाकाय धरणात मासेमारीमुळे जर पाणी विषारी होण्याचा धोका निर्माण होऊ  शकतो, तर लहानशा साठवण तलावात हा धोका कित्येक पटीने अधिक असू शकतो, हा मुद्दा मांडला जात आहे. त्याचमुळे या तलावात मत्स्यपालन ठेका देण्याचे कुठल्याच अंगाने संयुक्तिक ठरत नसल्याने हा ठराव विखंडित करण्यासाठी पाठविण्याची कापडणीस यांनी शिफारस केली असेल तर ती योग्यच ठरते. असे असतांना या ठेक्यास विरोध दर्शविल्याची शिक्षा म्हणून कापडणीस यांची अनपेक्षितपणे बदली केली गेल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे. महापालिकेतील विरोधी महागठबंधन आघाडीने आता या ठरावावरुन सत्ताधारी काँग्रेस-शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कापडणीस यांच्या बदलीमागे या ठेक्याचे कारण असल्याचा जाहीर आरोप आघाडीने केला. तसेच मत्स्यपालन ठेक्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ठेका देण्याचा हा प्रयत्न कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल, असा इशारा आघाडीचे नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांनी दिला आहे.

कार्यकाळ पूर्ण झाला नसतांनाही उपायुक्त कापडणीस यांची अचानक चाळीसगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे. करोना महामारीला तोंड देतांना घटना प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी पेलतांना गेल्या वर्षभरापासून ते अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट घेत असल्याची प्रचिती शहरवासियांनी वेळोवेळी घेतली आहे. प्राणवायूची कमतरता असो, करोना केंद्रांची उभारणी असो की रुग्णांच्या नमुन्यांची वेळेत तपासणी होऊन उपचार सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याचा विषय असो, प्रत्येकवेळी कापडणीस आघाडीवर होते.

तळवाडे साठवण तलावात मत्स्यपालन ठेका देण्यासंदर्भात महापालिकेच्या सभेने ठराव संमत केला आहे. त्याच्या सर्व तांत्रिक बाजू तपासल्यानंतर त्याविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

कैलास बच्छाव (शहर अभियंता,मालेगाव महापालिका)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 1:33 am

Web Title: conspiracy in fishing contract in reserve lake zws 70
Next Stories
1 कडक निर्बंध आणि पाणी टंचाईमुळे आदिवासींचे स्थलांतर
2 म्युकरोमायकोसिसचे अनेक रुग्ण महात्मा फुले आरोग्य योजनेच्या लाभापासून वंचित
3 तीन हजार क्विंटल भाजीपाल्याचे काय?
Just Now!
X