नियंत्रण ठेवण्याची मागणी, मूळ किंमतीवर नवीन छापील किंमत

नाशिक : ‘करोना’ शी दोन हात करण्यासाठी नागरिकांनी घरीच रहा. सुरक्षित राहा, असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत असून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अपवाद वगळता बहुतेकांकडून पाठिंबा मिळत आहे. खबरदारी म्हणून अनेकांकडून प्रमाणापेक्षा अधिक किराणा भरण्यात येत असतांना त्यात झालेली दरवाढ ग्राहकांना त्रस्त करणारी आहे. मूळ किंमतींवर नवीन छापील किंमती चिकटविण्याचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाने या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात टाळेबंदीमुळे सर्वत्र काम बंद असल्याने घरातील कर्त्यां पुरूषांसह सर्व सदस्य घरीच असून शाळा- महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी वर्गही घरी आहे. प्रशासनाकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा न करण्याचे आवाहन केले जात असले तरी अनेकांकडून किराणा दुकानातून जादा अन्नधान्य भरले जात आहे. त्यामुळे किराणा दुकानांसमोर गर्दी कायम आहे. अधिक माल घेतला जात असल्याने काही जणांचे किराणा मालाचे देयक नेहमीपेक्षा पाच-दहा हजार रूपयांनी अधिक येत आहे. काही घरांमध्ये उन्हाळी सुटीत वर्षभर पुरेल एवढा तांदुळ, गहू, डाळी आधीच भरून ठेवले जातात.

त्यांना ऊन दाखवत किटक नाशक पावडर वापर करत ते बंदिस्त ठेवले जाते. या सर्वाचा परिणाम म्हणून धान्य बाजारपेठेतील मागणी क्षमतेपेक्षा वाढली असून याचा फायदा मील व्यापाऱ्यांकडून उचलला जात असून  यामुळे वाद होत आहेत.

भाववाढीने कंबरडे मोडण्याची वेळ

एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळी सुट्टीमुळे वर्षभराचे धान्य भरण्याची आमच्याकडे पध्दत आहे. तसेच याच महिन्यात उन्हाळी कामे म्हणून पापड, मसाले असे खाद्यपदार्थही घरीच तयार केले जातात. सध्या या सर्व कामांवर फुली मारण्याची वेळ आली आहे. वेतनकपात होत असल्याने आधीच आर्थिक गणित बिघडण्यास सुरूवात झाली आहे. यात भर म्हणून किराणा मालाचे दर वाढल्याने महिन्याचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. रेशन दुकानातही धान्य मिळत नाही. घरात ज्येष्ठ मंडळी असल्याने डाळींचा वापर सातत्याने होतो. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

– अक्षदा सोनार  (गृहिणी)

मिल मालकांकडून लूट

किरकोळ धान्य व्यापारी ज्यांच्याकडून माल विकत घेतात, त्या मील मालक विक्रेत्यांनी धान्याचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढवले आहेत. जो माल बाजारात कोणीही खरेदी करणार नाही असा माल ते आमच्या माथी मारत आहेत. तसेच मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून किराणा मालात पाच ते १० रुपयांची वाढ किलोमागे झाली आहे. शासनाने मील मालकांच्या विक्री धोरणावर नियंत्रण ठेवावे. ग्राहकांनी घाबरून जावू नये. आपल्याकडे, अद्याप नवा गहू आलेला नाही. गहु बाजारपेठेत येण्यास एक महिन्याचा विलंब आहे. मात्र आता खरेदी केली तर चढय़ा दराने करावी लागेल. ग्राहकांनी संयम बाळगावा.

– प्रफुल्ल संचेती (अध्यक्ष, नाशिक जिल्हा किरकोळ धान्य व्यापारी संघटना)

मजूर, गरीब वर्गाचे भाववाढीमुळे हाल

किराणा मालात झालेली दरवाढ आश्चर्यकारक आहे. टाळेबंदीमुळे शहरातील कंपन्या, कारखाने बंद आहेत. त्यामुळे कंत्राटी स्वरूपाचे काम करणारे कामगार, मजूर यांना पैसे मिळणे बंद झाले आहे. त्यातच घर चालविण्यासाठी किराणा माल विकत घ्यावा, तर त्यांच्या किंमती आवाक्यापलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे गरीब, मजूर वर्गाला किराणा माल घेणे परवडेनासे झाले आहे. किराणा मालाच्या दरवाढीवर नियंत्रण येणे गरजेचे आहे -शशिकांत जाधव (अध्यक्ष, नाशिक इंडस्टिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन)