४० जणांची प्रकृती चिंताजनक

दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागात धरणांसह नैसर्गिक स्रोतांनी तळ गाठल्यामुळे विहिरी, कूपनलिका वा जिथून पाणी मिळेल त्या पर्यायांवर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, ज्या ठिकाणहून हे पाणी उचलले जाते, त्याचे शुद्धीकरण, तपासणी वा र्निजतुकीकरण होत नसल्याने मातोरी येथे ग्रामस्थांना पाण्यातून विषबाधेला सामोरे जावे लागले. गावातील ४०० हून अधिक जणांना विषबाधा झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. रुग्णांची संख्या मोठी असल्याने संबंधितांना जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करत उपचार सुरू आहेत. ४० हून अधिक ग्रामस्थांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान सरपंचांचा बेसावधपणा आणि गटविकास अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे हे संकट ओढावले असल्याचा आरोप ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.

शहरापासून जवळच असलेल्या मातोरी गावास गोदावरी नदीतून पाणी उचलून पुरवठा केला जातो. सध्या गोदावरी नदीत पाणी नसल्याने गावाला विहिरी, कूपनलिका यातून पाणी पुरवले जात आहे. ग्रामपंचायतीच्या स्वतच्या काही कूपनलिका आणि विहिरी आहेत. टंचाईची स्थिती लक्षात घेऊन त्यातून पाण्याचा उपसा करत हे पाणी टाकीत आणून जलवाहिनीद्वारे गावात पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील पाण्याच्या टाकीची दोन महिन्यांपासून स्वच्छता करण्यात आली नव्हती. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी जल र्निजतुकीकरण, टाकीची स्वच्छता यासाठी पाठपुरावाही केला. तथापि, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत उपसा केलेले पाणी टाकीत टाकले गेल्याचा आरोप होत आहे. टाकीची स्वच्छता झाली नसल्याने कृमी, कीटक राहून हे पाणी दूषित झाल्याचा अंदाज आहे. हे दूषित पाणी अवघ्या गावाची प्रकृती बिघडविणारे ठरले.

घरात पाणी प्यायल्यामुळे गुरुवारी सायंकाळपासून काहींना अस्वस्थ वाटण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी हे प्रमाण वाढत जाऊन दुपापर्यंत हा आकडा तब्बल ४०० च्या घरात पोहचला. ग्रामस्थांना उलटय़ा, जुलाब, अस्वस्थ वाटणे, अंगात कापरे भरणे यासह अन्य काही त्रास सुरू झाला. काहींना गॅस्ट्रोसदृश त्रास झाल्याने पोटात प्रचंड वेदना झाल्या. यामुळे काहींनी खासगी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, गिरणारे ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. एकापाठोपाठ रुग्ण दाखल होऊ लागल्यावर जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने औषधसाठा घेऊन गावात धाव घेतली. या पथकाने मोकळ्या आवारात रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली.  पोलीस यंत्रणेने सहकार्य करीत आवश्यक बंदोबस्त आणि रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले. दूषित पाण्यामुळे झालेल्या विषबाधेच्या घटनेमुळे आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर गिरणारे तसेच नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, पाण्यामुळे घडलेल्या या विषबाधेच्या प्रकरणात ग्रामस्थांनी सरपंच, गटविकास अधिकारी आदींना जबाबदार धरले आहे. जल र्निजतुकीकरणाचा विषय योग्य वेळी मार्गी लागला असता तर या भयावह स्थितीला तोंड द्यावे लागले नसते, असे काहींनी म्हटले आहे.

पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित होते. पाणीपुरवठा योजना, त्यातील अडथळे व प्रश्न यांचा विचार होत नसल्याची तक्रार अनेकांनी केली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, गावातील पाणीपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.

पोलीस धावले मदतीला

गावातील विहीर आणि कूपनलिका यातून उचललेले दूषित पाणी प्यायल्यामुळे मातोरी गावात शेकडो ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा मदतीला धावली. ग्रामस्थांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी नेण्यासाठी मदत करण्यात आली.

रुग्णांची प्रकृती स्थिर

दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडला असून नागरिकांनी पाणी उकळून गार करून पिणे गरजेचे आहे. दूषित पाण्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. काहींना योग्य त्या उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले तर काहींवर अद्याप उपचार सुरू आहेत.

– डॉ. प्रतिभा पगार (वैद्यकीय अधिकारी, गिरणारे ग्रामीण रुग्णालय)

विषबाधेनंतर सर्वाना जाग

सरपंच  व उपसरपंच यांच्याकडे पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र ते बेसावध राहिले. त्यामुळे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांना ते प्यायल्यामुळे त्रास झाला. या घटनेनंतर गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरंपच आणि अन्य यंत्रणा खडबडून जागी झाली.

– पंडितराव कातळ  (ग्रामपंचायत सदस्य)