05 March 2021

News Flash

मेहेर ते सीबीएस रस्त्याचीएक बाजू वाहनांसाठी सुरू

सोमवारी सकाळपासून मेहेर सिग्नल ते सीबीएस दरम्यान स्मार्ट रस्त्याची एक बाजू वाहनधारकांसाठी खुली करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

उर्वरित काम अद्याप अधांतरी

सोमवारी सकाळपासून मेहेर सिग्नल ते सीबीएस दरम्यान स्मार्ट रस्त्याची एक बाजू वाहनधारकांसाठी खुली करण्यात आली. रस्ता खुला झाला असला तरी त्याची माहिती अधिकृतपणे देण्याचे औदार्य महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीने दाखविलेले नाही. परिणामी, पहिल्या दिवशी या मार्गावर काही अपवाद वगळता वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. बहुतांश वाहनधारक नेहमीप्रमाणे सांगली बँक सिग्नल, शालिमारमार्गे पुढे मार्गस्थ झाले. स्मार्ट रस्त्याची एक बाजू वाहतुकीस खुली न करताच दुसऱ्या बाजूकडे काही दिवसांपूर्वी खोदकाम सुरू झाले होते. आता एक बाजू खुली झाल्यामुळे वाहतुकीत पुन्हा नव्याने बदल होणे क्रमप्राप्त आहे.

मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीचे कारण ठरलेल्या स्मार्ट रस्त्याच्या कामाची एक बाजू ३१ जानेवारीपर्यंत खुली करण्याची मुदत ठेकेदार आधीच पाळू शकले नाही. दुसऱ्या बाजूचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. नव्याने मुदतवाढीस पालिकेने नकार दिला आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका स्मार्ट रस्त्याचे काम मुदतीत न केल्यामुळे फेब्रुवारीच्या प्रारंभी पालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तेव्हा संबंधिताने घाईघाईत दुसऱ्या बाजूचे खोदकाम हाती घेतले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाचे प्रवेशद्वार वगळता उर्वरित काही भागांत रस्ता फोडण्याचे काम सुरू आहे.

दंडात्मक कारवाईचा इशारा दिल्याच्या २० व्या दिवशी मेहेर सिग्नल ते सीबीएस हा मार्ग खुला झाला. मुळात रस्ते कामामुळे मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्र्यंबक नाका- अशोक स्तंभ एकेरी वाहतूक आहे. अशोक स्तंभ-मेहेर सिग्नलकडून त्र्यंबक नाक्याकडे जाणारी वाहने रविवार कारंजा, शालिमारमार्गे वळविण्यात आली. अशोक स्तंभ ते सीबीएस किंवा त्र्यंबक नाका ही रस्त्याची संपूर्ण एक बाजू खुली झाल्यास वाहतूक कोंडी काही अंशी कमी होईल.

मेहेर सिग्नल ते सीबीएस या खुल्या झालेल्या रस्त्यावर एकेरी वाहतूक राहील की दुहेरी याची स्पष्टता अद्याप झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयात ये-जा करण्यासाठी खुल्या झालेल्या मार्गातील जुना दुभाजक तोडून व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचे काम वेगाने सुरू झाल्यानंतर खुल्या झालेल्या मार्गावरून मेहेरकडून सीबीएसकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना वाहन नेता येईल की नाही, हे अनिश्चित आहे. दुसरीकडे अशोक स्तंभ ते मेहेर दरम्यानची बाजू खुली होण्यास किती दिवस लागतील, हे कोणाला सांगता येत नाही. आतापर्यंतच्या अनेक मुदती उलटल्या आहेत. अशोक स्तंभ ते सीबीएस चौक ही दुसरी बाजू खुली करून सरळ वाहतूक होईल. तोवर दररोजचा त्रास सहन करत पर्यायी रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे हे वाहनधारकांच्या हाती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 3:49 am

Web Title: continued for one side vehicles from meher to cbs road
Next Stories
1 अंतर्गत मतभेद विसरुन केवळ पक्षनिष्ठेला महत्त्व द्यावे!
2 करवाढीवरुन गदारोळ ; भाजप-शिवसेनेत पालिका सभागृहात जुंपली
3 किसान सभेच्या मोर्चाने काय साधले?
Just Now!
X