मासवण पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत अनियमितता झाल्याचा समितीचा आरोप

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : तालुक्यातील मासवण पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले नसतानाच या योजनेचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ७२ लाख रुपयांची रक्कम काढल्याच्या वृत्ताने संताप व्यक्त केला जात आहे.

मासवण व पाच गाव पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वसई-विरार महापालिकेच्या जलवाहिनीतून हे पाणी मिळणार आहे. या योजनेत मासवन, वसरोली, खरशेत, वाकडी, वादीवली, कटाळे, लोवरे, निहे आणि गोवाडे ही गावे समाविष्ट आहेत. या योजनेसाठी सुमारे पाच कोटींचा निधी प्रस्तावित आहे. ही योजना आर. घुले या ठेकेदाराला निविदाप्रक्रियेतून मिळाली आहे. यात दहा टक्के अधिक रकमेची निविदा भरून हे काम त्याला मिळाले आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करावयाचे आहे. जून २०१९ मध्ये ठेकेदाराला कामाचा आदेश मिळाला आहे. मात्र वर्ष उलटूनही हे काम सुरू झालेले नाही.योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा समिती आहे. कामे करीत असताना  प्रशासनाकडून समिती व्यवस्थापनाला विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

नियोजनशून्य दीर्घ चर्चा..

* दोन दिवसांपूर्वी या योजनेसंदर्भात पालघर पंचायत समिती सभागृहात पाणीपुरवठा समिती आणि पाणीपुरवठा प्रशासन तसेच गटविकास अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यात पाणी व्यवस्थापन समितीचे अनेक पदाधिकारी तसेच प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत योजनेसंदर्भात बराच वेळ खल झाला. मात्र, योजना सुरू न केल्याचे व्यवस्थापन समितीमार्फत सांगण्यात आले.

* जलवाहिनी जात असलेल्या जमिनी वन विभागाच्या असून त्यांच्या व अनेक परवानग्या, ठराव प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. तरीही योजना तयार करताना या बाबी लक्षात का घेतल्या नाहीत, असा सवाल  करण्यात आला.

* याशिवाय या योजनेच्या कामासाठी ग्रामसभेचे  ५० टक्क्य़ांहून अधिक उपस्थिती असलेले ठराव घेणे अपेक्षित असल्याचे पत्रही प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. मात्र करोनाकाळात शासनाने कोणत्याही सभांच्या आयोजनास बंदी असल्याने आता ग्रामसभा आयोजित करायच्या कशा, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

गेल्या वर्षी कार्यादेश मिळूनही अद्याप काम सुरू  झालेले नाही. त्यामुळे भविष्यात गावांत पाणी टंचाईची भीती आहे.

चेतन पाटील, उपसभापती

परवानगीविषयक तांत्रिक अडचणी असताना ७२ लाख रुपये काढले गेले, यावर आक्षेप आहे. समितीला विश्वासात न घेता कामे केली .

कमळाकर दळवी,अध्यक्ष, स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्थापन समिती

जलवाहिनी खरेदीसाठी हे देयक ठेकेदाराला रीतसर प्रक्रियेने देण्यात आले आहे.

प्रदीप कुलकर्णी, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पं. स.पालघर