महापालिके च्या प्रस्तावित नाशिक-कसारा मार्गास राज्य परिवहनचा विरोध

नाशिक : महापालिकेच्या जुलैपासून सुरू होणाऱ्या शहर बस सेवेत भविष्यात ‘नाशिक-कसारा’ यासारख्या मार्गावर सेवा देण्याचा विचार केला जात असला तरी राज्य परिवहन महामंडळाने त्यास विरोध दर्शविला आहे. महापालिकेला सध्या शहरासह लगतच्या २० किलोमीटरच्या परिसरात १४६ मार्गावर वाहतुकीस परवानगी मिळालेली आहे. पुढील काळात मनपाची बससेवा त्र्यंबकेश्वर, कसारापर्यंत विस्तारण्यासह नाशिक दर्शन बसही सुरु करण्याचा मनोदय आहे. राज्य परिवहन महामंडळास नाशिक-कसारा, नाशिक-त्र्यंबकेश्वर या मार्गावर चांगले उत्पन्न मिळते. अशा मार्गावर सेवा देण्यावरून मनपा आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्यात चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.

प्रदीर्घ काळापासून राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात असणारी शहर बससेवा आता महापालिका नाशिक महानगर परिवहन कंपनीच्या माध्यमातून एक जुलैपासून सुरू करीत आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या बैठकीत तयारीचा आढावा घेतला गेला. पहिल्या टप्प्यात नऊ मार्गावर ५० बस धावण्याचे नियोजन आहे. टप्प्याटप्प्याने ही सेवा विस्तारली जाईल. आगामी काळात ओझर विमानतळ, त्र्यंबकेश्वर, कसारापर्यंत सेवा देण्याचा मानस आहे. नाशिक दर्शन बस, सुला वाईन, बोट क्लब आदी ठिकाणापर्यंत लवकरच मार्ग तयार करून बस सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

मनपा बस सेवेचे सध्याचे आणि प्रस्तावित काही मार्गाने राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होणार आहे. नाशिक-कसारा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर हे त्यापैकीच दोन. या दोन्ही मार्गावर एरवी (करोना काळातील निर्बंध वगळता) महामंडळाला घसघशीत उत्पन्न मिळते. नाशिक-कसारा मार्गावर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत २५ ते ३० बसच्या अविरतपणे फेऱ्या होतात. नाशिक-मुंबई ये-जा करणाऱ्यांसाठी लोकलला संलग्न ही सेवा आहे. फायद्याच्या मार्गावर महानगर परिवहन कंपनीचे लक्ष आहे. या मार्गावर सेवा सुरू करण्याबाबत मनपाकडून तसे अधिकृतपणे काही आलेले नाही. परंतु, अशा मार्गावर नाशिक महानगर परिवहन

कंपनीच्या सेवेला आमचा आक्षेप राहणार असल्याचे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

नाशिक-कसाराप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक-ओझरमिग अशा अनेक मार्गावरही महापालिका-राज्य परिवहन महामंडळ यांच्यात बेबनाव होण्याची चिन्हे आहेत. नाशिक दर्शन ही बस सेवा राज्य परिवहन चालविते. ती देखील महामंडळ सहजपणे मनपाच्या ताब्यात देईल का, हा प्रश्न आहे. करोना काळात र्निबधामुळे सध्या अनेक मार्गावर कमी बसेस धावतात. परंतु, निर्बंध शिथिल झाल्यानंतर फायद्याच्या मार्गांवरून उभयतांत संघर्षांची ठिणगी पडणार आहे.

सध्या मनपा हद्दीलगत २० किलोमीटरची मर्यादा

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने महानगर परिवहन महामंडळास महापालिका हद्दीत आणि मनपा हद्दीच्या पलिकडील लगतच्या २० किलोमीटर परिसरात टप्पा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. तिकीट दरासही मान्यता देण्यात आली. नाशिक-कसारा, नाशिक-त्र्यंबकेश्वर हे भविष्यात प्रस्तावित असणारे मार्ग परवानगी मिळालेल्या यादीत नाहीत. कारण, प्राधिकरणाने मनपा हद्दीसह २० किलोमीटरची मर्यादा घालून दिलेली आहे. त्याचा विचार केल्यास नाशिक-कसारा हा ६५ किलोमीटर तर नाशिक-त्र्यंबकेश्वर ३० किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. अशा मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला प्राधिकरणाकडे पुन्हा नव्याने परवानगी मागावी लागेल. त्यावेळी राज्य परिवहन महामंडळाने अधिकृतपणे आक्षेप नोंदविण्याची भूमिका घेतली आहे.