विभागात ७१ जण ताब्यात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच मराठी या मातृभाषेच्या पेपरला विभागात ७१ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले. त्यात जळगाव येथील सर्वाधिक ६९ तर दोन विद्यार्थी नंदुरबारचे आहेत. नाशिक, धुळे येथील अहवाल निरंक असल्याची माहिती विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिली.

शैक्षणिक कारकीर्दीस दिशा देणारे वर्ष म्हणून दहावीच्या परीक्षेकडे बघितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दहावी परीक्षेविषयी कमालीची अस्वस्थता आढळते. परीक्षेसाठी विभागातून दोन लाख, सात हजार ९८५ परीक्षार्थी असून ४३३ केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्य़ातील ९४ हजार ५३३ विद्यार्थी यामध्ये समाविष्ट आहेत. परीक्षार्थीमध्ये काही अपंग, अंध विद्यार्थ्यांंचा समावेश आहे.

जिल्हा परिसरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना वर्ग शोधून देणे, आसन व्यवस्था दाखविणे यासाठी पालकांची लगबग दिसून आली. काही ठिकाणी मात्र पालकांना शाळेच्या आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पालकांकडून विद्यार्थ्यांची बाहेरील आवारातच घोकंपट्टी सुरू राहिली. दुसरीकडे, कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून २७ भरारी पथकांसह प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आले.