खान्देशात रुग्ण संख्या कमी

नाशिक : विभागात धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे नगर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. विभागातील एकूण ६५२० सक्रिय रुग्णांपैकी ५३१९ हे केवळ एकाच नगर जिल्ह्यात आहेत. नाशिकमध्ये ही संख्या ११०५ रुग्ण आहेत. धुळे जिल्ह्यात सहा, जळगाव ७७ आणि नंदुरबारमध्ये १३ सक्रिय रुग्ण आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असताना नगर जिल्ह्यात मात्र अकस्मात रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य सेवा मंडळाच्या अहवालानुसार मागील २४ तासात १५११ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर याच दिवसात १२४६ नवीन रुग्ण आढळले. यातही नगरमध्ये सर्वाधिक (१०५०), नाशिक जिल्ह्यात (१९०) धुळे (दोन), जळगाव (चार), रुग्णांचा समावेश आहे. नंदुरबारमध्ये एकही नवीन रुग्ण सापडला नाही. याच दिवशी एकूण ३४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के आहे. मृत्यूदर २.०३ टक्के आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या २५ हजार १४७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ४३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. विभागात आतापर्यंत ५५ लाख ५३ हजार २१० व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठविले गेले. त्यातील १६.५५ टक्के नमुने सकारात्मक आढळले. पहिल्या व दुसऱ्या लाटेत विभागात नऊ लाख ३० हजार ५२७  इतके करोनाबाधित आढळले. त्यातील नऊ लाख पाच हजार ५० रुग्ण बरे झाले. तर १८ हजार ९०१ रुग्णांचा मृत्यू झाला.