अनिकेत साठे

करोनाच्या सावटामुळे शेतमजूर गावी निघून गेले. द्राक्ष काढणी आणि माल वेष्टित करण्यास कोणी नाही. बंदमुळे देशांतर्गत बाजारासाठी व्यापारी माल खरेदीला तयार नाही. निर्यातक्षम द्राक्षांची वाहतूक करणारे कंटेनर वेगवेगळ्या भागांत अडकून पडले आहेत. युरोपातील मागणी ओसरत आहे. त्यात आता अवकाळी पावसाची भर पडली. सद्य:स्थितीत बेदाणे उत्पादनाचा पर्याय आहे. मात्र, उत्पादकपाच रुपये किलोने माल घेत नाहीत. जिल्ह्य़ातील हजारो एकर बागांमधील तयार द्राक्षे मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवस बंदी लागू झाली. यामध्ये हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात बाजारात येणारी द्राक्षे आणि उत्पादकभरडला गेला. संदीप खालकर यांची निफाडच्या भेंडाळी गावात बाग आहे. काढणीअभावी द्राक्षे खराब होत आहेत. देशातील बहुतांश बाजारपेठा बंद आहेत. ग्राहक नसल्याने माल खरेदी करून आम्ही काय करणार, असे व्यापारी सांगतात. एकाच वेळी हजारो उत्पादकविचित्र कोंडीत सापडले आहेत. बेदाणानिर्मितीसाठी द्राक्षे देण्याचा ते प्रयत्न करतात. मात्र त्याचे अनुभव चांगले नाहीत. पाच रुपये किलो दराने द्राक्ष देण्याची तयारी दर्शवूनही वेगवेगळी कारणे पुढे केली जातात, माल खरेदी टाळली जात असल्याचे खालकर सांगतात.

मालाच्या तुटवडय़ामुळे हंगामाच्या अखेरीस भाव उंचावण्याची शक्यता होती. करोना, संचारबंदीमुळे द्राक्ष व्यवसाय अडचणीत आल्याचे द्राक्ष बागाईतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी सांगितले. वाहने परप्रांतांत जाऊ शकत नसल्याने व्यापारी निघून गेले. मजुरांनी गावाकडे धाव घेतली. द्राक्ष छाटणी, प्रतवारीनुसार वेष्टित करणे, वाहनांमध्ये माल भरणे अशा कामांसाठी मजूर नाही. निर्यातदारांनी आधी खरेदी केलेल्या मालाने शीतगृहे भरलेली आहेत. संबंधितांचे कंटेनर अडकून पडल्याने त्या मालाची वाहतूक होत नसल्याचे बोराडे यांनी नमूद केले. वेष्टनासाठी लागणारे पेटय़ा, पट्टी आदीचा तुटवडा आहे. पाचपेक्षा अधिक जणांना हे काम करण्यास प्रतिबंध आहे. ३० ते ३५ टक्के बागांची द्राक्ष काढणी बाकी असताना हे संकट कोसळले. बेदाणेनिर्मिती सोपी नाही. यामुळे उत्पादकदेशोधडीला लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

निर्यातही थंडावली

युरोपासह जगभरातील देशांच्या सीमा बंद झाल्याचा फटका द्राक्ष निर्यातीला बसला आहे. गेल्या वर्षी २६ मार्चपर्यंत सात हजार २०० कंटेनर युरोपात पाठविण्यात आले होते. या वर्षी याच तारखेला हे प्रमाण ५८६३ कंटेनर इतके असल्याचे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी सांगितले. या वेळी एकटय़ा युरोपात सुमारे आठ हजार कंटेनर द्राक्ष निर्यात होण्याचा अंदाज होता. देशासह जगभरातील सीमा बंद झाल्यामुळे पुरवठा व्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली.

जिल्ह्य़ात जवळपास ३० हजार एकरावरील बागा काढणे बाकी आहे. त्यातील चार लाख टन द्राक्षांची काढणी आणि विक्री बाकी आहे. करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत प्रत्येक वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. यामुळे यातून काहीतरी मार्ग काढता येईल. केवळ मनुष्यबळाच्या संदर्भाने आवश्यक ती काळजी प्रत्येकास घ्यावी लागणार आहे. युरोप वा इतर देशात द्राक्ष गेल्यानंतर त्यांची विक्री होऊन त्या मालाचे पैसे मिळणार का, हा प्रश्न आहे. युरोपातील मागणी घटली आहे. दरातही घसरण झाली. देशांतर्गत बाजारपेठेत विक्री व्यवस्था हाताळणीचा विचार करावा लागेल. महाराष्ट्रात विक्रीचा पर्याय उत्पादकांसमोर आहे. बेदाणानिर्मिती करून वर्षभर त्याची विक्री करता येईल.

– विलास शिंदे, प्रमुख, सह्य़ाद्री शेतकरी उत्पादककंपनी