|| अनिकेत साठे

घरोघरी गंभीर आजाराच्या रुग्णांची तपासणी  

नाशिक : शहरात करोनाचा आलेख उंचावत असतांना त्यावर नियंत्रणासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने आता आपल्या शाळांमधील तब्बल ६०० शिक्षकांच्या मदतीने घरोघरी इतर आजार असणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याचे ठरवले आहे. विहित कार्यक्रमानुसार गुरूवारपासून सुरू होणारे हे सर्वेक्षण साहित्याची उपलब्धता न झाल्यामुळे एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ आली. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आहे. तसे संरक्षण शिक्षकांना नाही. घरोघरी जाण्यासाठी संरक्षक पोषाख देण्यासही नकार दिला गेला. नियुक्तीवेळी आमची आरोग्य तपासणी झाली नसल्याकडे शिक्षक लक्ष वेधत आहेत.

गंभीर आजारांच्या रूग्णांच्या आरोग्य तपासणीवर भर दिला जाणार आहे. सर्वेक्षणासाठी पालिका शाळांमधील ६०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक घरात भेट देऊन शिक्षक संभाव्य धोका असणाऱ्या व्यक्तीची माहिती घेतील. ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरने तपासणी करतील. भ्रमणध्वनी अ‍ॅपमार्फत संबंधिताची माहिती नोंदवतील. या अनुषंगाने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. परंतु, भ्रमणध्वनी अ‍ॅप डाऊनलोड करून घरी  पाठविण्यात आले. हे सर्वेक्षण २३ ते २७ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. पहिल्या दिवशी मोहिमेचा श्रीगणेशा झाला नाही. कारण, आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा झाला नाही. शिक्षकांना कित्येक तास शाळांमध्ये प्रतीक्षा करावी लागली. परंतु, सायंकाळपर्यंत अनेक शाळांमध्ये साहित्य पोहोचलेले नव्हते. सातपूरमधील काही शाळांमध्ये साहित्य वितरित झाल्याचे सांगितले जाते.  घरोघरी सर्वेक्षण करताना शिक्षक आपला जीव धोक्यात घालणार आहेत. सुरक्षेसाठी संरक्षक पोषाख देण्याची मागणी अनेकांनी केली. पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. सर्वेक्षणाआधी नियुक्त शिक्षकांच्या आरोग्य तपासणीकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

 

सॅनिटायझरसाठी रिकामी बाटली आणा

महापालिकेने सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी शिक्षकांची विभागनिहाय प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. स्टेडिअम तसेच पालिकेच्या मोकळ्या जागी हे शिबीर पार पडले. सर्वेक्षणासाठी नियुक्त शिक्षकांमधील एकाचीही प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही. भ्रमणध्वनी अ‍ॅपवर हे सर्वेक्षण होईल. त्याची माहिती मार्गदर्शन करणाऱ्यांनाच नव्हती, असे शिक्षक सांगतात. सर्वेक्षणासाठी महापालिका शिक्षकांना सुरक्षेसाठी सॅनिटायझर, मुखपट्टी, टोपी, चेहरा झाकण्यासाठी ‘फेसशिल्ड’ देणार आहे. सॅनिटायझरसाठी रिकामी बाटली घरून आणण्यास सांगण्यात आले. शिक्षक बाटल्या घेऊन आले, पण ते मिळाले नाही. ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर वापरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले नाही. या कामावेळी कोणी बाधित झाल्यास त्यांची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत.

या सर्वेक्षणासाठी ६०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारपासून विभागनिहाय या कामास प्रत्यक्षात सुरूवात होईल. घरोघरी जाणाऱ्या शिक्षकांना सुरक्षेसाठी मुखपट्टी, सॅनिटायझर, हातमोजे उपलब्ध केले जातील. संशयितांच्या तपासणीसाठी पल्स-ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर दिले जाणार आहे. देशहिताचे हे काम असून अडचणी सांगितल्यास ते होणार नाही. आरोग्य विम्यासह शिक्षकांनी मांडलेल्या अन्य प्रश्नांवर शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल.

– प्रदीप चौधरी (उपायुक्त, महापालिका)