* शहरात मृत करोनाग्रस्तांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक * युवा वर्गातील २८ जणांचाही समावेश

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठांचा अधिक्याने समावेश असून त्या खालोखाल ५० ते ६० वयोगटातील व्यक्ती आहेत. या वयात विविध व्याधी जडतात. त्याचाही परिणाम करोना नियंत्रित न होण्यावर होत आहे. सर्वसाधारणपणे तरुणाईत प्रतिकार शक्ती अधिक असल्याचे मानले जाते.परंतु, निष्काळजीपणा, व्यसनाधीनता यामुळे त्यातील काही जण करोनाचे बळी ठरले. मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.

शहरात करोनाचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे. एकूण रुग्ण संख्या साडेअकरा हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपासून प्रतिदिन सरासरी ३०० ते ४०० नवीन रुग्ण आढळत होते. सोमवारी हा आकडा ८७६ ने उंचावला. तथापि, १० दिवसांपासून वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या प्रतिजन चाचण्यांच्या नोंदी या दिवशी समाविष्ट केल्यामुळे ही आकडेवारी उंचावल्याचे महापालिकेने म्हटले आहे. करोनामुळे आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झालेला आहे. यात २१६ पुरूष तर ८४ महिला आहेत. म्हणजे महिलांपेक्षा पुरूषांसाठी तो अधिक जिवघेणा ठरला. अन्य आजार असलेल्यांना करोनाचा अधिक्याने धोका असल्याचे लक्षात येते. यामुळे महापालिकेने अशा व्यक्तींचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. आजवर मृत्यू झालेल्यांच्या यादीत १५ वर्ष वयोगटाखालील कोणाचाही समावेश नाही. १५ ते ३० या वयोगटातील सहा तर ३० ते ४० वयोगटातील २२ जण आहेत. ४० ते ५० वयोगटातील ४३, ५० ते ६० वयोगटातील ८१ आणि ६० वर्षांवरील सर्वाधिक १४८ रुग्ण आहेत.

वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त ११५ व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला. यात मधुमेह, अतिताण, हृदयरोग, मूत्रपिंड, श्वसनाशी संबंधित विकार आदी व्याधीग्रस्तांचा अंतर्भाव आहे. लक्षणे असूनही अनेक जण रुग्णालयात जात नाहीत. तरुण वर्गात निष्काळजीपणा अधिक आहे, असे निरीक्षण करोना केंद्राचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी नोंदविले. स्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेतली जाते. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात एक दिवस उपचार घेतल्यानंतर २८, दोन आणि तीन दिवस उपचार घेणारे प्रत्येकी १४, चार दिवस उपचार घेणारे सात, पाच दिवस उपचार घेणारे एक, सहा दिवस उपचार घेणारे तीन तर सात दिवसांहून अधिक काळ उपचार घेणाऱ्या २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराबाबत नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरलेली आहे. परंतु, वेळेत उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे. तसे करणे अनेक जण टाळतात. रुग्णांच्या मनांतील भय घालविण्यासाठी महापालिका, सायकॅट्रिक सोसायटी आणि भोसला महाविद्यालय यांच्या पुढाकारातून सल्ला, समुपदेशन केंद्रही सुरू करण्यात आल्याचे पलोड यांनी सांगितले.

करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये जगात ५० आणि ६० वर्ष वयोगटाहून अधिकच्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आढळते. या वयोगटात प्रतिकारक्षमता कमी असते. अन्य व्याधीचा प्रादुर्भाव झालेला असतो. मृत्यू झालेल्यांमध्ये मधुमेहींचे प्रमाण जास्त आहे. अशा रुग्णांचा साखर किंवा रक्तदाब नियंत्रणात नसतो. मग हा आजार बळावतो. त्यांच्याकडून औषधाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तरुण वयोगटातील मृत्यूंमागे व्यसनाधीनता हे कारण आहे. गुटखा, तंबाखू सेवन, धूम्रपान यामुळे फुफ्फुसाचे विकार बळावतात. घरगुती औषधोपचार करून वैद्यकीय उपचारास कालापव्यय केला जातो. काहींना अतिआत्मविश्वास नडतो. करोनाबाबत भीती हे देखील मृत्यू होण्याचे एक कारण आहे. 

– वैद्य विक्रांत जाधव