प्रशासकीय निर्णयात विरोधाभास

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर, शहरातील इयत्ता पाचवी ते नववी आणि ११ वीचे वर्ग १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असला तरी दुसरीकडे खासगी शिकवण्या आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरूच असल्याने प्रशासकीय निर्णयातील विरोधाभास उघड झाला आहे. खासगी शिकवण्यांमध्ये गर्दी होते. वरिष्ठ महाविद्यालयातही वेगळी स्थिती नाही. असे असताना केवळ शाळेतील प्रत्यक्ष वर्ग बंद ठेवून काय साधले जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपासून जिल्ह्यत करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. शहरात किमान २०० ते ३०० च्या दरम्यान नवीन रुग्ण सापडतात. त्यात भोसला महाविद्यालयाच्या वसतिगृहातील नऊ विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आल्यावर महापालिका सतर्क झाली. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर केवळ विद्यार्थी नव्हे, तर काही महाविद्यालयांत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बाधित झाल्याची उदाहरणे आहेत. अनेक महिन्यांनी उघडलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली.

सुरक्षित अंतर, मुखपट्टीचे नियम गळून पडले. एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी १५ मार्चपर्यंत १० वी आणि १२ वी वगळता इयत्ता पाचवी ते नववी आणि ११ वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. यात वरिष्ठ महाविद्यालये, खासगी शिकवण्यांचा विचार झाला नसल्याने महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांचा वावर कायम असल्याचे चित्र आहे.

वरिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष वर्ग सुरू असले तरी विद्यार्थी वर्गात कमी आणि आवारात जास्त असतात. अनेक महाविद्यालयात दररोज येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठी आहे की, त्यांचे तापमापन वा तत्सम बाबी पार पाडणे अवघड ठरते. महाविद्यालय प्रवेशद्वारातून ये-जा करताना विद्यार्थी मुखपट्टी लावतात. एकदा प्रांगणात आले की, ती हनुवटीवर अथवा खिशात जाते. घोळक्याने जमलेल्यांना नियमांचे पालन करायला लावणे प्राध्यापकांसाठी जोखमीचे ठरत आहे. पाचवी ते नववी आणि ११ वीचे वर्ग तूर्तास बंद असले तरी संबंधितांच्या खासगी शिकवण्यांवर कोणतेही र्निबध नाहीत. त्या नेहमीप्रमाणे सुरू आहेत. म्हणजे गर्दी टाळण्यासाठी शाळांसाठी एक आणि खासगी शिकवण्या, वरिष्ठ महाविद्यालयांना वेगळा निकष लावला गेल्याचे दिसत आहे.

महापालिकेला इयत्ता पाचवी ते १२ वीपर्यंतच्या निर्णयाचे अधिकार असल्याचे कारण पुढे करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील शाळा वा महाविद्यालयांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते १२ वी आणि वरिष्ठ महाविद्यालयातील वर्ग नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.