नाशिक : कडक र्निबध लागू केल्यामुळे जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या दररोज दोन हजारने कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी करण्यात र्निबध महत्वाचे ठरले. प्राणवायूचा पुरवठा नियमित नसल्याने टंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. केंद्राकडे नियोजन गेल्यामुळे रेमडेसिविर अनियमित स्वरूपात मिळत असल्याचा दावा त्यांनी के ला.

शुक्रवारी पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करोना आणि लसीकरण आढावा बैठक पार पडली. प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत डॉक्टरांनी त्याचा काळजीपूर्वक वापर करावा. किमान दोन दिवस पुरेल इतक्या प्राणवायूचा साठा आपल्या रुग्णालयात करावा, असेही त्यांनी सूचित केले. १० कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यात १० महत्वाच्या रुग्णालयात प्राणवायू निर्मिती केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्राणवायूच्या कामकाजासाठी नियमित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. मोठय़ा रुग्णालयांनी कायमस्वरूपी प्राणवायूची व्यवस्था उभारावी, रुग्णसंख्या कमी झाल्यास प्राणवायूची मागणी कमी होईल, असे भुजबळ यांनी नमूद केले.

सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांनी आपल्याला आवश्यक असलेले औषध, प्राणवायूचा नियमित अहवाल देऊन आपली मागणी कळवावी. टाळेबंदीचा परिणाम दिसत असून पुढील काळातही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असल्यास स्थानिक बाजारपेठा बंद ठेवाव्यात. भाजीपाला बाजार शक्यतो मोकळ्या जागेत, मैदानावर असावा. एक मेपासून १८ वर्षांपुढील वयोगटाचे लसीकरण सुरू होत आहे. परंतु, आठ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. केंद्र सरकारकडून लसी मिळतात, त्यावर ही मोहीम सुरू आहे. पुरेशा लसी जोपर्यंत हाती येत नाही, तोपर्यंत लसीकरण होणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस यांचे सहकार्य हवे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शहरात आले याबद्दल आनंद आहे. फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. करोनाच्या परिस्थितीत राजकारण न करता सर्वानी मिळून काम करण्याची अपेक्षा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.