नाशिक : करोना विषाणू साथीवर टाळेबंदी हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्याने केवळ प्रादुर्भावाची शक्यता कमी करता येते. करोनावर प्रतिबंधाचे ते साधन आहे, असे मत राज्याच्या करोना कृतिगटाचे प्रमुख आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले.

येथील ‘दवप्रभा फिल्म अ‍ॅण्ड प्रॉडक्शन’च्या वतीने शुक्रवारी आयोजित ज्येष्ठ लेखिका, शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. करोना साथीच्या प्रश्नावर टाळेबंदी हे नेमके उत्तर नाही. पण निर्बंध न लावता सर्व खुले करणे संसर्गास कारणीभूत ठरू शकते. शिवाय, आता निर्बंधदेखील तितकेसे कठोर राहिलेले नाहीत. लहान प्रतिबंधक क्षेत्रे तयार केली जात आहेत, असेही डॉ. ओक यांनी नमूद केले.

करोनाचे नवीन उत्परिवर्तित प्रकार आल्यामुळे संसर्गाची धास्ती वाढली आहे. राज्याच्या सात जिल्ह्यांत प्रादुर्भाव अधिक आहे, त्यामुळे तेथे निर्बंध कायम ठेवून अन्य भाग खुले करणे शक्य आहे, असे डॉ. ओक म्हणाले.

करोनाचे निदान केवळ आरटीपीसीआर चाचणीने व्हायला हवे, असे मत डॉ. ओक यांनी व्यक्त केले. करोना उपचारात औषधांचा धरसोडपणा केला गेला नाही. उपचारात जी औषधे वापरली गेली, ती इतर आजारांसाठी आधीपासून वापरात आहेत. राज्यात उभारल्या जाणाऱ्या प्राणवायू प्रकल्पांमुळे शासकीय रुग्णालयांसह अन्य रुग्णालयांची क्षमता वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या तरी करोना संसर्ग होऊ शकतो, परंतु संसर्ग सौम्य स्वरूपाचा असू शकतो. बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही. लस घेतल्याने आपण सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास हातभार लावतो, असेही डॉ. संजय ओक यांनी स्पष्ट केले.