शून्य ते १० वर्षातील चार हजारहून अधिक मुलेही बाधित

नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून सर्व वयोगटातील व्यक्ती या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. शहरातील एकूण बाधितांमध्ये ६१ टक्के पुरूष तर ३९ टक्के महिलांचा समावेश आहे. ३१ ते ४० वयोगटात सर्वाधिक म्हणजे २६ हजारहून अधिक रुग्ण आहेत. शून्य ते १० वयोगटात चार हजारहून अधिक तर ११ ते २० वयोगटात साडेआठ हजारहून अधिक मुले बाधित झाली आहेत.

करोनाच्या पहिल्या लाटेत जो वयोगट सुरक्षित राहिला, तो दुसऱ्या लाटेत अधिक्याने बाधित होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील दोन दिवसात शहरात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत काहिशी घट झाली आहे. मागील २४ तासात १९५४ नवीन रुग्ण आढळले. १३ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत एकूण एक लाख ८६ हजार ३४४ रुग्ण आढळले. त्यातील एक लाख ५८ हजार १५५ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. एकूण मृतांची संख्या १५०४ इतकी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २७ हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे.

महापालिकेने २७ एप्रिलच्या अहवालानुसार वयोगटनिहाय रुग्णांचे वर्गीकरण केले आहे. त्यावरून सर्व वयोगटांना करोनाची हळूहळू झळ बसत असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेनंतर दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले होते. काहीअंशी शाळा, महाविद्यालये सुरू झाली. शिकवणी, क्रीडा प्रशिक्षण आदी उपक्रम सुरू झाले. वेगवेगळ्या कारणांनी या वयोगटातील मुले बाहेर पडली. करोनाचा उद्रेक झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद झाली. पण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भटकं ती काही थांबली नाही. जे फारसे घराबाहेर पडले नाही ते कुटुंबातील बाहेर पडणाऱ्या अन्य सदस्यांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले.

शून्य ते १० वयोगटातील एकूण चार हजार ३९ मुले बाधित झाली आहेत. यात २१९० मुले तसेच १८४९ मुलींचा समावेश आहे. ११ ते २० वयोगटातील बाधितांची संख्या आठ हजार ५०७ इतकी आहे. त्यामध्ये चार हजार ९५१ मुले तर तीन हजार ५५६ मुलींचा अंतर्भाव आहे. २१ ते ३० वयोगटातील जवळपास २१ हजार जण बाधित असून त्यात  १२ हजार ३११ मुले आठ हजार ६६२ मुली आहेत. वयोगटनिहाय विचार करता करोनाच्या विळख्यात ३१ ते ४० वयोगट अधिक्याने सापडला आहे. यातील तब्बल २६ हजार २३ जण बाधित झाले आहे. त्यात १६ हजार ४५९ पुरूष तर नऊ हजार ५६४ महिलांचा समावेश आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ४१ ते ५० दरम्यानचा वयोगट आहे. २१ हजार ९२ जण बाधित झाले. त्यात १३ हजार ३७ पुरूष तर आठ हजार ५५ महिलांचा समावेश आहे.

नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे दोन्ही गट आहेत. या गटांना प्रादुर्भाव होण्याचे तेही एक महत्वाचे कारण ठरले. ५१ ते ६० वयोगटातील १६ हजार ९८४ रुग्ण असून त्यात १० हजार २३७ पुरूष आणि सहा हजार ७४७ महिलांचा अंतर्भाव आहे. ६१ वयोगटापुढील १५ हजार ८०३ जण बाधित झाले. नऊ हजार ४२३ पुरूष तर सहा हजार ३८० महिलांचा समावेश आहे. सर्व वयोगटात महिलांच्या तुलनेत पुरूष रुग्णांची संख्या अधिक आहे. कामानिमित्त बाहेर ये-जा करणाऱ्या पुरूषांमुळे घरातील महिला, मुलेही बाधित झाल्याची शक्यता आहे.