चाचण्या वाढवून औषधसाठा करण्याचे नियोजन

नाशिक : करोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिदिन एक हजारपेक्षा अधिक आरटीपीसीआर तपासण्या, फीवर क्लिनिकची संख्यावाढ, अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यक्तींच्या विशेष सर्वेक्षणाबरोबर १५ दिवसांसाठी औषध आणि साधनसामग्रीची अतिरिक्त साठवणूक, १०८ रुग्णवाहिकांमार्फत जनजागृती आदी तयारी करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी महापालिका आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांना दिल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात सद्य:स्थितीत १०३२ खाटा करोनासाठी तर १५२१ खाटा करोनाव्यतिरिक्त आजारांच्या रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध आहेत. नाशिक आणि मालेगाव महापालिका, गामीण रुग्णालयातील ७०३ खाटा असून तेथे २८९ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय डीसीएचसी केंद्रात ३१५२ खाटा असून तिथे २७४ तर करोना काळजी केंद्रातील (सीसीसी) ४२२५ खाटा असून तिथे सध्या ३५२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात प्राणवायूची सुविधा असणाऱ्या २०७८ खाटा असून ३६२ व्हेंटिलेटरची सुविधा आहे. करोनाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेऊन महापालिका, ग्रामीण रुग्णालये वा तत्सम ठिकाणी कोणकोणती तयारी करावी याचे निर्देश जिल्हा करोना कक्षाच्या प्रमुख तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिले. प्राणवायूचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. ६० वर्षांवरील आणि अन्य व्याधी असलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी आणि मर्यादित ठेवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. या व्यक्तींसाठी प्रत्येक सामान्य, उपजिल्हा रुग्णालयात ‘को मोर्बिलिटी क्लिनिक’ सुरू करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

काही दिवसांत नाशिक शहरात चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याच्या तक्रारी होत आहेत. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक शहरात प्रतिदिन ३०० तर ग्रामीणमध्ये ६००, मालेगाव महापालिका क्षेत्रात १०० अशा जिल्ह्यांसाठी एक हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर तपासण्यांची आवश्यकता असल्याचे सूचित करण्यात आले आहे. ज्या भागात तापसदृश आजाराचे अधिक रुग्ण सापडतील, तिथे चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल, याकडे लक्ष वेधण्यात आले.

अधिक जनसंपर्क असणाऱ्यांच्या चाचण्यांना प्राधान्य

दुसऱ्या लाटेच्या येण्यात अधिक जनसंपर्क असणाऱ्या व्यक्ती करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारक ठरू शकतात. हे लक्षात घेऊन पुढील काळात किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, हॉटेल मालक, वेटर, घरगुती सेवा पुरविणारे दूधवाले, मोलकरीण, भाजीपाला विक्रेते, लाँड्री व्यावसायिक, मालमोटार, टेम्पो, रिक्षाचालक यांच्यासह हमाल, रंगकाम करणारे, बांधकामावरील मजूर, सोसायटींमधील सुरक्षारक्षक, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी, पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान आदी व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांच्या प्रामुख्याने चाचण्या केल्या जाणार आहेत. दैनंदिन चाचण्यांमध्ये संबंधितांच्या चाचण्यांचे प्रमाण ५० टक्के असावे, असे डॉ. रावखंडे यांनी सूचित केले आहे.