26 November 2020

News Flash

व्याधीग्रस्तांच्या आरोग्याकडे लक्ष द्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमेमध्ये सुमारे अडीच लाख अन्य व्याधींचे रुग्ण सापडले होते.

करोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सूचना

नाशिक : वातावरणातील वाढता गारवा आणि दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी लक्षात घेता जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमेमध्ये सुमारे अडीच लाख अन्य व्याधींचे रुग्ण सापडले होते. त्यांची तपासणी करून संबंधितांवर उपचार करावे, जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल, अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात महसूलविषयक आढावा बैठकीत करोनाच्या स्थितीवरही चर्चा करण्यात आली. याप्रसंगी थोरात बोलत होते.  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी करोनाची सद्य:स्थिती सादर के ली.

जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून मृत्यूदर १.६५ टक्के आहे. मृत्यूदराबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक ३०व्या क्रमांकावर आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यातील संसर्गबाधितांमध्ये घट झाली आहे. जिल्ह्यात रेमडेसीवीर आणि ऑक्सिजन सिलिंडरांचा पुरवठादेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. दिवाळी आणि वाढणारी थंडी यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने व्यवस्थापन केल्याची माहिती मांढरे यांनी दिली.

यावेळी डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे या आमदारांसह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव आदी उपस्थित होते.

महसूल कामांचा आढावा

जिल्ह्यातील १९७८ महसूल गावांपैकी १९७५ गावांची सातबाराची ऑनलाइन उपलब्ध आहे. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, असे थोरात यांनी नमूद केले. प्रलंबित ई फेरफार प्रकरणांबाबत नागरिकांना त्रास होऊ  नये यासाठी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही म्हणून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सेवा हमी कायद्याद्वारे ई-हक्क प्रणालीवरील कामांचा यशस्वी पाठपुरावा हीदेखील चांगली बाब आहे. बैठकीत मांढरे यांनी जिल्ह्याच्या महसूलविषयक बाबींची माहिती दिली. त्यामध्ये सातबारा संगणकीकरण, १०१ सेवांचा समावेश असलेल्या सेवा हमी कायद्याची कार्यवाही, महाराजस्व अभियानमधील कार्यवाही आदींचा समावेश होता. विविध प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यासाठी टपालाद्वारे पत्र पाठवले जात असल्यामुळे त्यात होणारा वेळ वाचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नोटिसा पाठवण्याचा अभिनव उपक्रम लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहिती मांढरे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:51 am

Web Title: corona virus second wavy revenue minister balasaheb thorat pay attention to health akp 94
Next Stories
1 दिवाळीनंतर कांदा दरात उसळी
2 नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य पर्यटकांसाठी आजपासून सुरू
3 पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या बनावट लाभार्थ्यांना वसुलीसाठी नोटीस
Just Now!
X