मास्क आणि  सॅनिटायझरचा कृत्रिम तुटवडा

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीपीई किट्स, एन-९५ मास्क आणि सॅनिटायझरची नितांत आवश्यकता असल्याने बाजारात कृत्रिम तूटवडा भासवून काळाबाजार केला जात आहे. अन्न-औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या प्रकारांना चाप लावण्यासाठी आता पोलीस मैदानात उतरले आहेत. उपरोक्त वस्तुंचा बेकायदेशीर साठा, चढय़ा दराने विक्री करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी स्थापलेली पाच विशेष भरारी पथके ही कारवाई करणार आहेत.

करोनाला  रोखण्यासाठी युध्दपातळीपर प्रयत्न केले जात असतांना या संकटाचा काही उत्पादक, औषध विक्रेते लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत. करोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक पीपीई किट्स, एन-९५ मास्क, हॅण्ड सॅनिटायझरची गरज असते. परंतु, काही दिवसांत बाजारातून या वस्तू गायब झाल्याचे भासविले जाते. या माध्यमातून उत्पादक आणि घाऊक विक्रेते काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हात स्वच्छ राखण्यासाठी उपयुक्त ठरणारी बनावट सॅनिटायझरची विक्री होत असल्याचे मागील आठवडय़ातील कारवाईतून स्पष्ट झाले होते. अन्न-औषध प्रशासनाने गोळे कॉलनीतील विक्रेत्यांवर छापे टाकत कारवाई केली होती. मास्क, सॅनिटायझर आणि पीपीई किट्सचा काळाबाजार रोखण्यासाठी त्यांना जिवनावश्यक वस्तुंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता या वस्तुंचा बेकायदेशीर साठा, चढय़ा दराने विक्री करणाऱ्यांविरुध्द जिवनावश्यक वस्तू कायद्याद्वारे कठोर कारवाई केली जाणार आहे.

उपरोक्त वस्तुंचा काळाबाजार रोखण्यासाठी आता पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. शहर पोलिसांनी पाच विशेष भरारी पथकांची नेमणूक केली आहे. पथकात एक अधिकारी आणि पाच कर्मचारी अशा सहा जणांचा समावेश आहे.

संपूर्ण शहरात काळ्या बाजारावर लक्ष दिले जाईल. पथकांना विविध ठिकाणी छापे टाकून मास्क, सॅनिटायझर आदी वस्तुंची चढय़ा दराने विक्री, साठेबाजी, बनावट सॅनिटायझर आणि मास्क आदींचा काळाबाजार करणाऱ्यांविरुध्द कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

बनावट सॅनिटायझर प्रकरणाची चौकशी संथ

अन्न आणि औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने गेल्या आठवडय़ात गोळे कॉलनी परिसरात घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांवर छापे टाकून राहुल एंटरप्रायजेस आणि आशापुरी एजन्सीतून बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा पकडला होता. एक लाख सहा हजार २१० रुपये किंमतीचे सॅनिटायझर जप्त करण्यात आले. या सॅनिटायझरचे विना परवानगी उत्पादन केल्याचे आढळून आले आहे. हे सॅनिटायझर परराज्यात उत्पादित केलेले आहेत. उत्पादकापर्यंत पोहचण्यासाठी साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. सॅनिटायझरचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने या प्रकरणाची चौकशी पुढे सरकलेली नाही. या प्रकरणात अद्याप गुन्हाही दाखल झालेला नाही. पुरावे जमविण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अन्न औषध प्रशासन विभागाच्या नाशिक कार्यालयात केवळ तीन निरीक्षक आहेत. संबंधितांना कारवाईचे अधिकार आहेत. मनुष्यबळाअभावी काळा बाजार रोखण्यासाठी या विभागाने पोलिसांची मदत घेतली आहे.