टाळेबंदीच्या पर्यायावर आज चर्चा

नाशिक : करोनाचा शिरकाव झाल्यानंतर वर्षभरात पहिल्यांदाच एकाच दिवसात जवळपास साडेतीन हजार नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. अंशत: टाळेबंदीतून फारसे काही साध्य झालेले नाही. प्रतिबंधित क्षेत्रासह बाजारपेठ, हॉटेल तसेच सार्वजनिक स्थळी नियमावलीचे पालन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदर स्थितीत करोनाबाधितांची संख्या अधिक असणाऱ्या शहरी, निमशहरी भागात पूर्णत: टाळेबंदी करायची की नाही, यावर शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

देशात सर्वाधिक रुग्णवाढ होणाऱ्या पहिल्या १० जिल्ह्यांच्या यादीत नाशिकचा समावेश आहे. मार्चच्या प्रारंभापासून करोनाचा आलेख उंचावत आहे. दुसऱ्या लाटेत प्रसाराचा वेग इतका वाढला की, दिवसागणिक बाधितांची संख्या साडेतीन हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी आजवरची सर्वाधिक म्हणजे ३३३८ इतकी रुग्णवाढ नोंदली गेली. बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांमुळे दुसऱ्या दिवशी यात आणखी भर पडते. एकाच दिवसात १५ जणांचा मृत्यू झाला. तसेच २२२४ रुग्ण बरे झाले.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत १८४९, ग्रामीण भागात ११९१ आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात २४५ आणि जिल्हाबा ५३ रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत १८ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मध्यंतरी अंशत: टाळेबंदी लागू केली होती. त्या अंतर्गत जीवनावश्यक वगळता अन्य दुकानांसाठी सायंकाळी सातपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली. हॉटेल, आसन व्यवस्था असणाऱ्या खाद्यगृहांसाठी निम्म्या क्षमतेने रात्री नऊपर्यंत मुभा देण्यात आली. शनिवार, रविवार या सुट्टीच्या

दिवशी बाजारपेठांमधील गर्दी रोखण्यासाठी सर्व दुकाने बंद ठेवली गेली. मुखपट्टी नसणाऱ्यांना थेट तपासणीला नेण्याची मोहीम राबविली जात आहे. सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आली. विविध पातळीवर प्रयत्न करूनही करोनाच्या संसर्गझळा नियंत्रणात आल्या नाहीत.

प्रतिबंधित क्षेत्रात नियमावलीची प्रभावीपणे अमलबजावणी करण्याचे जाहीर झाले. परंतु, प्रत्यक्षात तिथे लक्ष ठेवण्यासाठी कुणी नसल्याचे उघड झाले. लक्षणे नसलेले किं वा सौम्य लक्षणे असणारे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातील बहुतांश जण गृह विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी ठोस व्यवस्था नाही. संबंधित घराबाहेर फिरून आले तरी कुणाला समजणार नाही. नियमांकडे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी डोळेझाक केलेली आहे. हॉटेलमधील गर्दी कुठेही कमी झालेली नाही. आसन व्यवस्था नसलेली खाद्यगृहे सातनंतर सर्रास सुरू असतात. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. या सर्वाचा परिपाक रुग्णसंख्या वाढण्यात होत आहे. शुक्रवारच्या बैठकीत या मुद्यांवर विचार विनिमय होईल.

नियमावलीचा सर्वत्र विसर

गतवर्षी टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे यावेळी अर्थचक्र आणि आरोग्यचक्र सुरळीत राखून उपाययोजनांवर भर देण्यात आला. मात्र, नियम धाब्यावर बसविले गेल्यामुळे चिंताजनक स्थिती झाली आहे. महाविद्यालये, खासगी शिकवण्या बंद असूनही महाविद्यालयीन युवक मुक्तपणे फिरताना आढळतात. बाजारपेठा, हॉटेल, बाजार समिती, भाजी बाजार आदी ठिकाणी अनेकांना नियमांचा विसर पडतो. यामध्ये बदल न झाल्यास पूर्णत: टाळेबंदी अटळ असल्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करोनाची स्थिती आणि उपाययोजना यांचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत टाळेबंदीबाबत विचारविनिमय होईल.