रंग विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षा

नाशिक : आनंदाच्या रंगात रंगा, असा संदेश देणारा ‘रंगोत्सव’ अर्थात रंगपंचमीवर पूर्वसंध्येला ‘करोना’ चे सावट असल्याचे शहरात दिसून आले. बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांनी रंग विक्रीसाठी ठाण मांडले असले तरी त्यांच्याकडे केवळ तूरळक ग्राहक वळले. रंगपंचमीच्या दिवशी काही प्रमाणात का होईना प्रतिसाद मिळेल, अशी त्यांना आशा आहे.

सर्वत्र करोनाची चर्चा सुरू असल्याने प्रत्येक जण आपआपल्या परीने खबरदारी घेऊ लागला आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा रद्द होत असतांना रंगोत्सवावरही याचा प्रभाव पडणे साहजिकच आहे. शहरात रंगपंचमीला पारंपरिक पध्दतीने रहाडीत डुंबत नाशिककर रंगोत्सवाचा आनंद लुटतात. या रंगोत्सवात रंग भरण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह अन्य ठिकाणी आकर्षक पिचकाऱ्या, कोरडे रंग, पाण्याचे फुगे यासह अन्य साहित्य उपलब्ध झाले आहे. त्याचे दरही माफक आहेत. मात्र या सर्व साहित्याकडे यंदा रंगप्रेमींनी पाठ फिरवली आहे.

करोनाविषयी समाज माध्यमात येणारी माहिती, बदलत्या वातावरणामुळे होणारा सर्दी, खोकल्याचा त्रास यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. करोनाच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत असतांना अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून यंदा रंगपंचमी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सामाजिक मंडळांनीही रंगोत्सवापासून दूर राहणे पसंत केले आहे. एक वर्ष रंगपंचमी साजरी न केल्याने काहीही बिघडत नसल्याचा सूर उमटू लागला आहे. या सर्वाचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत आहे. रंग, पिचकारी यांच्या किंमती कमी करूनही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.

रविवार कारंजा येथील रंग विक्रेते अब्दुल शेख यांनी यंदा रंगपंचमीसाठी कोणीही उत्सुक नसल्याचे सांगितले. आम्ही याआधी औरंगाबाद येथे रंग विक्रीसाठी गेलो होतो. तिथेही प्रतिसाद मिळाला नाही. तिकडे जाण्याचे आणि येण्याचेही पैसे सुटले नाहीत. नाशिकमध्ये आलो. इथेही तीच परिस्थिती आहे. मूळ गुंतवलेले भांडवलही निघत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रमेश पाडळे यांनी राज्यात ठिकठिकाणी रंग विक्रीसाठी जात आहोत. पण आम्हांला फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने रासायनिक रंगावर काही निर्बंध आणले. आता पर्यावरणपूरक रंग असले तरी वर्षभर ते सांभाळण्याची कसरत करावी लागणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.