News Flash

दिवसाला १४७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

करोना काळातील नाशिकमधील स्मशानभूमींमधील चित्र

करोना काळातील नाशिकमधील स्मशानभूमींमधील चित्र

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरातील सर्व स्मशानभूमींवर (अमरधाम) कमालीचा ताण आला असून एप्रिल महिन्यात या सर्व ठिकाणी दिवसाला १४७ मयतांवर अंत्यसंस्कार होत आहेत. एक ते १६ एप्रिल या कालावधीत पाच विभागांतील स्मशानभूमींमध्ये एकूण २ हजार ३६० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात १ हजार ७९३ करोनाबाधित तर ५६७ अन्य कारणांनी मयत झालेल्यांचा समावेश आहे. शहरात १७ ठिकाणी सन्मानभूमी असून तिथे अंत्यसंस्कारासाठी ८० खाटा आहेत.

करोना संकटात औषधे, प्राणवायूचा तुटवडा भासत असताना स्मशानभूमीत देखील अंत्यसंस्कारसाठी नातेवाईकांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. यावरून ठेकेदारांना नोटीसही बजावली गेली. एप्रिल महिन्यात पंचवटी विभागातील अमरधाममध्ये एकूण ६८० (यातील ४९८ करोनाबाधित), नाशिकरोड विभागात ४३४ (३९०), नाशिक पूर्व ६५३ (५४५), नवीन नाशिक विभागात ४९० (३२५), सातपूर विभागात १०३ (५२) अशा एकूण २३६० मयतांवर महापालिकेच्या योजनेतंर्गत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.

१६ दिवसांची ही आकडेवारी आहे. त्याचा विचार केल्यास पालिकेच्या स्मशानभूमीत दिवसाला १४७ जणांवर अंत्यसंस्कार होत असून मयतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरात ग्रामीण भागाबरोबर आसपासच्या जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. उपचारादरम्यान त्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास पार्थिव गावी नेण्यास परवानगी नसते. त्यामुळे स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करावे लागतात. या एकंदर स्थितीत अमरधाममध्ये जिथे जागा मोकळी असेल, तिथे अंतिम संस्कार करावे लागत आहेत. बाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे जानेवारी ते मार्च महिन्यात सरासरी जितके सरण लागले नाही, त्यापेक्षा दुप्पट एप्रिलच्या पंधरवाडय़ात लागले. महापालिकेच्यावतीने अंत्यसंस्कार मोफत केले जात आहेत. करोना काळात पारंपरिक पध्दतीने पार्थिव स्मशानभूमीत आणू शकत नाही. एक किं वा दोन व्यक्ती सोबत असतात. पार्थिवास खांदा देण्यासाठी वा सरणावर मृतदेह ठेवण्यासाठी कोणी नसते. याचा गैरफायदा घेत काही घटक पैशांची मागणी करीत असल्याचे पलिकेचे अधिकारी मान्य करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:54 am

Web Title: coronavirus in nashik cremation on 147 bodies per day zws 70
Next Stories
1 शहरात वेळ मर्यादेस दुकानदार, व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद
2 अंतर्गत मूल्यमापन नसल्यास गुणपत्रक कसे करणार?
3 नाशिक विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी ४६ दिवसांवर
Just Now!
X