15 July 2020

News Flash

Coronavirus : दररोजच्या प्रवासामुळे संसर्गात वाढ

कित्येकांचा मुंबई, ठाणे, मालेगावात नियमित प्रवास

कित्येकांचा मुंबई, ठाणे, मालेगावात नियमित प्रवास

अनिकेत साठे लोकसत्ता

नाशिक : मुंबई, ठाणे, मालेगाव या करोनाबाधित क्षेत्रात दररोज नाशिकहून ये-जा करणाऱ्यांची संख्या आज देखील मोठी आहे. कृषिमाल वाहतूक, मुंबईत अत्यावश्यक सेवेतील अनेक जण नियमित भ्रमंती करतात. पंचवटी एक्स्प्रेसचा पर्याय बंद असल्याने काही चाकरमान्यांनी भाडेतत्वावरील वाहनांचा आधार घेतला आहे. काही मोठे अधिकारी स्वत:च्या खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ची पाटी लावून सहजपणे मार्गस्थ होतात. कृषी बाजार समिती, लगतचे फुलेनगर, वडाळा या भागाची करोनाचा उद्रेक होण्याकडे वाटचाल सुरू होण्यामागे हे घटक कारक ठरल्याचा अनुमान महापालिकेच्या करोना नियंत्रण कक्षाने काढला आहे.

टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात बरेचसे निर्बंध शिथील होत आहेत. करोनाबाधित क्षेत्रात नियमित भटकंती, त्या भागातून प्रवास आणि ये-जा केल्यामुळे रूग्णसंख्येचा आलेख उंचावत आहे. शहरात आतापर्यंत करोनाचे २३४ रुग्ण आढळले. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला. उपचारानंतर ८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या १४३ रुग्ण उपचार घेत आहेत. कृषिमाल वाहतुकीस सरकारने टाळेबंदीत परवानगी दिली होती. नाशिकहून मुंबई आणि परिसरात दररोज १०० वाहने भाजीपाला घेऊन जातात. पिंपळगाव, लासलगाव येथून जाणारी कांद्याची वाहने वेगळीच. करोनाबाधित भागात जा-ये करणे अनेकांना महागात पडले. तशीच स्थिती वडाळ्यात वास्तव्यास असणाऱ्यांची आहे. अनेकांचे मालेगावात दुसरे घर आहे. तिथे त्यांचा नियमित संपर्क असतो. ही बाब कृषी उत्पन्न बाजार समिती आणि वडाळ्यात करोनाबाधितांची संख्या विस्तारण्यास कारणीभूत ठरली. नोकरीनिमित्त मुंबईला नियमित ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची भिस्त असणारी पंचवटी एक्स्प्रेस सव्वा दोन महिन्यांपासून बंद आहे.

काही जण मुंबई महापालिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईला मुक्कामी थांबण्याऐवजी नाशिकहून ये-जा करणे पसंत केले आहे. त्यांची संख्या ६० ते ७० इतकी असल्याचा अंदाज आहे. गटागटाने वाहने भाडेतत्वावर घेऊन त्यांचा दैनंदिन मुंबई प्रवास सुरू असल्याचे सांगितले जाते. ठाणे, मुंबई तसेच इतरत्र अत्यावश्यक सेवेत नसणारे काही मोठे अधिकारी नाशिकहून नियमितपणे ये-जा करतात. खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’चा फलक  लागला की कुठे विचारणाही होत नाही. मुळात, करोनाबाधित क्षेत्रात संचारास आजही प्रतिबंध आहे. शहर पोलिसांनी दररोज प्रवासाला कोणालाच परवानगी दिलेली नाही. म्हणजे अनेकांचा बेकायदेशीरपणे हा प्रवास होत आहे. मुंबई, ठाण्यातील अनेक भाग वाढत्या रुग्णांमुळे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. या स्थितीत उपरोक्त क्षेत्रात दैनंदिन प्रवास करणाऱ्यांमुळे धोका वाढत आहे. निर्बंध शिथील होत असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. संबंधितामुळे वेगवेगळ्या भागात संक्रमणाचा धोका वाढल्याचे चित्र आहे.

शहरात रुग्णांची संख्या उंचावण्यामागे मुंबईसह आसपासचा परिसर आणि मालेगावमध्ये ये-जा करण्याचा संबंध आहे. कामानिमित्त त्या भागात वारंवार संचार करणारे बाधित होत असल्याचे दिसून येते. यामध्ये मुंबई, ठाण्यात भाजीपाला घेऊन जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीतील घटक आहेत. वडाळा परिसरातील अनेक रुग्णांचा मालेगावशी संबंध आहे. यामुळे नाशिक शहरात वडाळा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर, त्यालगतचे फुलेनगर हे करोनाचे केंद्रबिंदू ठरण्याच्या मार्गावर आहेत.

– डॉ. आवेश पलोड (समन्वय अधिकारी, करोना नियंत्रण कक्ष, महापालिका)

मुंबई, ठाणे वा आसपासच्या परिसरात दररोज ये-जा करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाकडून कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक वा तत्सम सेवेतील काहींना आठवडय़ातून एकदाच येण्या-जाण्यासाठी इ पास देण्यात आले आहेत.

– लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:12 am

Web Title: coronavirus infection increased due to daily travel by people of nashik zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना संकटाविरुद्ध प्रशासकीय लढाईत उपायुक्त रात्रंदिन कार्यरत 
2 टाळेबंदीत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
3 नाशिक विभागात रुग्ण संख्या बावीसशेच्या दिशेने
Just Now!
X