प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या पावणे दोनशेच्या मार्गावर,अनेक भागांत करोनाचे रुग्ण

नाशिक : शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अद्याप यश येत नसल्याचे चित्र आहे. अनेक भागात करोनाचे रुग्ण सापडत असून यातील फुलेनगर, जुन्या नाशिकमधील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, काजीपुरा, वडाळा हे करोनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या १३०० टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. सध्या ६९४ रुग्ण उपचार घेत असून वेगवेगळ्या भागात एकूण १६४ प्रतिबंधित आहेत. यावरून अनेक भागात करोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्य़ाची रुग्ण संख्याही तीन हजाराचा टप्प्यावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे.

मंगळवारी दुपापर्यंत जिल्ह्य़ातील ५९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १२ नवीन रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. ४४ जणांचे अहवाल नकारात्मक आले. तर तीन रुग्णांचे अहवाल अनिर्णित आहेत. बाधितांमध्ये शहरातील एकाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १२९५ रुग्ण आढळले. त्यातील ६८ जणांचा मृत्यू झाला. अहवाल सकारात्मक येण्याआधीच काही रुग्ण दगावले. त्यांच्या संपर्कात आल्याने कुटुंबियांसह अंत्यविधीला गेलेल्यांना अनेकांना प्रादुर्भाव झाल्याचे आधीच अनेक उदाहरणे होती. पावसाळ्यात शहरात वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. उपचाराअंती ५३३ रुग्ण घरी परतले. सध्या ६९४ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण सापडलेले क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर केले जाते. सध्या शहरात तसे १६४ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. याआधी प्रतिबंधित होऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यानंतर १३३ प्रतिबंधित क्षेत्रातील र्निबध काढून घेतले गेले. असे काही मोजकेच भाग असतील जिथे करोनाचा रुग्ण सापडला नाही. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, चुंचाळे, म्हसरूळ, पेठ रोड, जुने नाशिकमधील दाट लोकवस्तीचा परिसर, वडाळा, इंदिरानगर, पाथर्डी, फुलेनगर, जेलरोड, भारतनगर झोपडपट्टी, सिडको आदी भागातील काही क्षेत्र प्रतिबंधित आहे.

या क्षेत्रात कठोर उपाय केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याची शक्यता आहे.

मालेगाव शहराने करोनाचा असाच कहर रमजान काळात अनुभवला होता. तेव्हा महापालिका, पोलीस यंत्रणेने प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष दिले.

जनजागृती करून संशयित रुग्णांच्या तपासणीवर भर दिला. जे मालेगाव महापालिकेला जमले ते नाशिक महापालिकेला का जमू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यंत्रणा निष्प्रभ ठरत असल्याने सत्ताधारी भाजपने व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा  देण्याचे धोरण ठेवले आहे.

करोनाचा वेगाने फैलाव होत असताना ऑनलाइन दोन सर्वसाधारण सभा झाल्या. त्यामध्ये करोनाऐवजी भलतेच विषय गाजले. आता गुरूवारी या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.

तीन हजारांच्या उंबरठय़ावर

मंगळवारी नव्याने १२ रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्य़ाची एकूण रुग्णसंख्या २८८६ वर पोहोचली. काही दिवसात नाशिकमध्ये दररोज १०० च्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. यामुळे नाशिक तीन हजारच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. करोनामुळे १७५ रुग्णांचा मृत्यू झाला. १६७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्य़ात १०३५ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील निम्म्याहून अधिक नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमध्येही रुग्णसंख्या वाढत असून तिथे २३९ जण उपचार घेत आहेत. मालेगावमध्ये ७८ तर जिल्ह्य़ाबाहेरील १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.