11 August 2020

News Flash

Coronavirus : शहरात करोनाचे १८५ नवीन रुग्ण

बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील रुग्णवाढीचा वेग कायम राहिला

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : शहर परिसरात करोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत असून बुधवारी दिवसभरात करोनाचे नवीन १८५ रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला. शहरातील रुग्णांची संख्या २२६५ वर पोहचली असून त्यातील १०२९ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले.

टाळेबंदीचे निर्बंध शिथील झाल्यानंतर बाजारपेठांसह इतरत्र नागरिकांचा संचार मोठय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर राखण्याच्या पथ्याकडे दुर्लक्ष झाले. दाट लोकवस्तीत करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला. फुलेनगर, वडाळा, जुने नाशिकमधील काही विशिष्ट भाग करोनाचे केंद्रबिंदू ठरले. करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत टाळेबंदी अर्थात संचारबंदीची कठोरपणे अमलबजावणी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील रुग्णवाढीचा वेग कायम राहिला. सकाळी शहरातील ५९ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २० जणांचा अहवाल सकारात्मक, तर ३९ जणांचा अहवाल नकारात्मक आला. दिवसभरात नवीन १८५ रुग्ण आढळल्याचे करोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख  डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.

दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे शहरातील मृतांची आकडेवारी १०७ वर पोहोचली आहे. बाधितांमध्ये पेठ रस्ता, नवनाथनगर, अमरधाम रस्ता, संत कबीरनगर, काझीपुरा, खोडेनगर, रामनगर, अश्विनीनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. संत कबीरनगर झोपडपट्टीत दाट वस्ती आहे. बहुतांश घरे परस्परांना लागून आहेत. या भागात सहा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. फुलेनगर, नाईकवाडी पुरा, वडाळा प्रमाणे या भागात स्थिती उद्भवू नये म्हणून धावपळ सुरू झाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. बाधितांच्या संपर्कातील येणारे अनेक रुग्ण सकारात्मक आढळत आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणे संपर्कातील संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे. संपर्कात आल्यानंतर साधारणत: पाच दिवसानंतर लक्षणे आढळतात. त्यामुळे बाधिताच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेण्यासाठी पाच दिवस प्रतीक्षा करावी.

ग्रामीण भागातही नव्या रुग्णांची भर

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव पसरत आहे. सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने ११ रुग्ण आढळले. यात विंचूर, मौजे सुकेणे, संसरी गाव, सारस्वत वाडी (देवळा), चांदवड, इगतपुरी, लासलगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ाच्या एकूण रुग्णसंख्येने ४३०० चा टप्पा ओलांडला आहे. करोनामुळे आतापर्यंत २४० रुग्णांचा मृत्यू झाला. यात नाशिक ग्रामीणचे ४७, नाशिक शहर १०७, मालेगाव महापालिका ७५, जिल्हाबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. उपचाराअंती दोन हजार ३४० रुग्णांना घरी सोडण्यात आले.

शहर पोलीस दलात करोनामुळे पहिला मृत्यू

मुंबईत अंधेरी येथे उपचार घेणाऱ्या शहर पोलीस दलातील करोनाबाधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. करोनाशी दोन हात करताना नाशिक ग्रामीणच्या तीन पोलिसांना जीव गमवावा लागला.  डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात संशयित पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता नऊ जण बाधित आढळले. उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली असल्याची  माहिती पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली. मरण पावलेले ५२ वर्षीय हवालदार करोनाग्रस्त असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात सेवा बजावत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  प्रकृती खालावत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु, उपचारांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. मंगळवारी रात्री करोनाविरूध्दचा संघर्ष संपला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 4:37 am

Web Title: coronavirus outbreak 185 new patients of corona in nashik city
टॅग Coronavirus
Next Stories
1 खासगी रुग्णालयांत ७०७ खाटा रिकाम्या
2 सायंकाळनंतर शुकशुकाट!
3 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम
Just Now!
X