निम्म्याहून अधिक रुग्ण बरे, २३८ जणांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या चार हजारापार गेली असून उपचारानंतर त्यातील निम्मे रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्य़ात नव्याने ७१ रुग्ण आढळले. यामुळे रुग्णसंख्या चार हजार ११४ वर गेली आहे. आतापर्यंत २३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात नाशिक ग्रामीणमधील ४७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १०५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७५ आणि इतर ११ जणांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील दोन हजार २४० करोनाबाधितांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत एक हजार ५३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २३८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.  प्रारंभी मालेगाव शहरात करोनाचा कहर सुरू  होता. सध्या तीच स्थिती नाशिक शहरात आहे. दररोज सरासरी १०० ते १२५ रुग्णांची भर पडत आहे. ग्रामीण भागातही काही विशिष्ट भागात रुग्णसंख्या वाढत आहे. दिवसभरात जिल्ह्य़ात करोनाचे एकूण ७१ रुग्ण आढळले. नाशिक महापालिका क्षेत्रात ४० तर ग्रामीण भागात २५ नवीन रुग्ण आढळले. शिंदे, देवळाली, इगतपुरी, सिन्नर, देवळा या भागातील हे रुग्ण आहेत.

सद्यस्थितीत दीड हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ७६, चांदवड आठ, सिन्नर ४४, देवळा दोन, दिंडोरी २१, निफाड ५८, नांदगांव नऊ, येवला ३२, त्र्यंबकेश्वर १७, कळवण एक, बागलाण १३, इगतपुरी २०, मालेगांव ग्रामीण १३ याप्रमाणे एकूण ३१४ रुग्णांचा समावेश आहे. सुरगाणा आणि पेठ या दोन तालुक्यात एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात एक हजार ९७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५० तर जिल्ह्याबाहेरील ३७ या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या ४१०० चा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण बरे झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.