12 August 2020

News Flash

खासगी रुग्णालयांत ७०७ खाटा रिकाम्या

करोनावरील अवास्तव उपचार खर्चाची धास्ती

(संग्रहित छायाचित्र)

करोनावरील अवास्तव उपचार खर्चाची धास्ती

नाशिक : खासगी रुग्णालयांकडून करोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे उघड झाल्यानंतर महापालिकेने रुग्णाची प्रकृती आणि खाटेनुसार किमान चार ते अधिकतम नऊ हजार रुपये प्रतिदिन असे दर निश्चित केले आहेत. तथापि, खासगी रुग्णालयाच्या कार्यपध्दतीमुळे बहुतांश खाटा आजही रिक्त असल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णालयांतील ७०७ खाटा रिक्त आहेत. रुग्णांचा शासकीय वा मविप्रचे रुग्णालय अथवा घरीच उपचाराकडे कल वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

करोना उपचारासाठी निश्चित केलेल्या रुग्णालयात ९५५ खाटांपैकी केवळ २४८ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक ११९ रुग्ण मविप्र शिक्षण संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आहेत. एरवी गोरगरीब रुग्णही याच रुग्णालयात जातात. काही दिवसांपासून शहरात करोनाचा कहर सुरू आहे. दिवसागणिक १०० ते १५० रुग्णांची भर पडत असून रुग्णसंख्या २२०० चा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत ११०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे उपचारासाठी त्या अनुषंगाने विस्तारीत व्यवस्था करावी लागत आहे.

याआधी महापालिकेने करोना रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांची निश्चिती केली. यातील किती खाटा राखीव असतील, त्या रुग्णांकडून किती दर आकारणी होईल, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध असतील, याचा तपशील जाहीर करण्यात आला होता. यात दिलेली माहिती आणि खासगी रुग्णालयातील प्रत्यक्षातील स्थिती याची महापालिकेच्या डॅशबोर्डवर पडताळणी केल्यावर विपरित स्थिती असल्याचे लक्षात येते. खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या देयकांमुळे रुग्ण धास्तावले आहेत. काही रुग्णांनी भलीमोठी देयके भरून देयकांबाबत तक्रारी केल्या होत्या.

त्यात तथ्य आढळून आल्यावर महापालिकेने अशोका मेडिकव्हर आणि सह्य़ाद्री या दोन रुग्णालयांना नोटीस बजावली. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या मुद्यावर शिवसेनेने मदतवाहिनी सुरू करत रुग्णांच्या तक्रारींवर कारवाईची मागणी लावून धरली आहे.  .

दरपत्रक जाहीर करूनही खासगी रुग्णालयांच्या कार्यपध्दतीने रुग्ण तिथे जातांना विचार करत असावे. अपोलो रुग्णालयात १०० खाटांची क्षमता असून तिथे सध्या २५ रुग्ण आहेत. उर्वरित ७४ खाटा रिक्त आहेत. बहुचर्चित अशोका मेडीकव्हरमध्ये २२५ खाटांची क्षमता असून तिथे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १७० खाटा रिक्त आहेत. सह्य़ाद्री रुग्णालयात वेगळी स्थिती नाही. या रुग्णालयात १०० पैकी २१ खाटांवर रुग्ण उपचार घेत असून उर्वरित खाटा रिकाम्या आहेत. वोक्हार्टमध्ये १८० पैकी २७ खाटांवर रुग्ण उपचार घेतात. उर्वरित १५३ खाटा अद्याप रिक्त असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मविप्रच्या रुग्णालयाची ३५० खाटांची क्षमता आहे. तिथे ११९ रुग्ण उपचार घेत असून २१९ खाटा रिक्त आहेत. मविप्रच्या रुग्णालयात विविध आजारांवरील उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे तिथे दर आकारणी होत नाही. करोनावरील उपचारासाठी निश्चित केलेल्या काही रुग्णालयांनी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. खाटा रिक्त राहण्यामागील कारणांमध्ये अवास्तव देयके ही बाब दुर्लक्षिता येणार नाही. या संदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी रुग्णांचा एका विशिष्ट रुग्णालयात जाण्याचा आग्रह असतो, असे सांगितले.

महापालिकेकडून दर निश्चित

महापालिकेने खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी रुग्णाची प्रकृती आणि खाटानुसार सर्वसाधारण विलगीकरणासाठी चार हजार, अतीदक्षता विभागासाठी साडेसात हजार आणि अतीदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांसाठी नऊ हजार रुपये दर निश्चित केले आहेत. यामध्ये दैनंदिन चाचण्या, वैद्यकीय-परिचारिका खर्च, नाश्ता, भोजन आदींचा समावेश आहे. रुग्णालयाच्या एका वॉर्डात अधिक रुग्ण असल्यास पीपीई संच, हातमोजे, मुखपट्टी, सॅनिटायझरचा आदींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 4:35 am

Web Title: coronavirus outbreak 707 beds vacant in private hospitals in nashik city
Next Stories
1 सायंकाळनंतर शुकशुकाट!
2 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम
3 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम
Just Now!
X