नाशिक : करोनाच्या सावटामुळे सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचना प्रशासनाच्या वतीने केली जात असली तरी अनेक विद्यार्थी आणि नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी आहे. पण अनेक विद्यार्थी महाविद्यालय आणि आसपासच्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणे फिरताना दिसतात. हे लक्षात आल्यावर काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर रोखण्याची व्यवस्था केली. अकस्मात मिळालेल्या सुटीचा आनंद घेण्याकडे अनेकांचा कल आहे. बंद चित्रपटगृह, मॉलची कसर ‘हाऊसफुल्ल’ झालेल्या हॉटेलांमधून भरून निघत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक निर्णय घेतले जात असले तरी त्यास काही घटकांकडून साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक वा खासगी ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन सर्वच पातळीवरून वारंवार केले जात आहे. याच उद्देशाने शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली गेली. चित्रपटगृह, मॉल (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता), जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्यात आले. जिल्ह्य़ात सामाजिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांवर प्रतिबंध आले. या निर्णयांमुळे शाळा, चित्रपटगृह,मॉलमधील गर्दी ओसरली असली तरी महाविद्यालयांमध्ये पहिल्या दिवशी वेगळेच चित्र दिसले.

इयत्ता १२ वीच्या परीक्षार्थीनी महाविद्यालयात उपस्थित राहणे अभिप्रेत आहे. कनिष्ठ, पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे महाविद्यालयांनी फलकांवर ठळकपणे लिहिलेले आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर मिळालेल्या सुटीचा विद्यार्थी मनसोक्त आनंद घेत आहे. अनेक जण नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आले. आवारात संबंधितांच्या गटांनी कित्येक तास ठाण मांडले होते. काही ठिकाणी प्राध्यापकांनी जाब विचारला असता संबंधितांनी सुटीविषयी माहिती नसल्याचे कारण पुढे केले. महाविद्यालये बंद असतांनाही कॉलेज रोडवरील गर्दी कमी झालेली नाही. उलट तेथील नेहमीचे कट्टे, आइस्क्रीम, हॉटेल आणि खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्ये घोळके वाढल्याचे लक्षात आले.

करोनामुळे उद्भवलेल्या धोक्याची फिकीर नसल्याचेच दिसून आले. सुट्टी असताना भटकंती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकवर्ग जबाबदार असल्याचे अनेक प्राध्यापकांनी सांगितले. महाविद्यालय आवारात विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात करून फलक लावण्यात आले. परीक्षा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशच दिला गेला नाही. यामुळे अनेक ठिकाणी पहिल्या दिवशी दिसणारी गर्दी मंगळवारी ओसरल्याचे पाहायला मिळाले.

हॉटेलमधील गर्दीचे काय?

मॉल्स, चित्रपटगृहातील गर्दी ओसरली असली तरी हॉटेलमध्ये नेहमीच्या तुलनेत गर्दी वाढल्याचे चित्र आहे. करोनाच्या धास्तीऐवजी अनेक नागरिक सुट्टीचा आनंद घेण्यात मग्न आहे. रविवारचा दिवस अनेकांनी कुटुंबीयांसह सोमेश्वर धबधबा वा तत्सम ठिकाणी गर्दी करून साजरी केली. धबधब्यातून फारसे पाणी वाहात नाही. तरीदेखील नेहमीच्या पर्यटनस्थळी भेट देण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. रात्री अनेक हॉटेलमध्ये इतकी गर्दी होती की, भोजनासाठी कित्येकांनी प्रतीक्षा केली. प्रशासनाने मॉल्स, चित्रपटगृहातील गर्दीवर प्रतिबंध आणला. परंतु, हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

करोनाला तोंड देताना नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. आपण गर्दी टाळायला हवी. प्रतिबंध हाच या आजारावरील उपाय आहे. एकमेकांकडून एकमेकांना संसर्ग होऊन हा आजार फैलावू शकतो. पुढील १५ ते २० दिवस गर्दी करू नये, गर्दीत सहभागी होऊ नये आणि गर्दी होईल असे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)