कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लागल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरात करोनाच्या आलेखात चढ-उतार होत असताना गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरातून मागील साडेसात महिन्यात जवळपास पावणे दोन लाख किलो अर्थात १७४.२७४ मेट्रिक टन घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. हा कचरा विल्होळीच्या प्रकल्पात शासनाच्या नियमावलीनुसार स्वतंत्रपणे ठेवून नष्ट करण्यात आला. घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याने त्याद्वारे इतरांना प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील टळला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी घरगुती जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीविषयी माहिती दिली. मार्च महिन्यापासून आजवर शहरात करोनाचे तब्बल ५८ हजार १७८ रुग्ण आढळले. त्यातील ५३ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले. सध्या साडेतीन हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

प्रारंभी करोनाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर रुग्णांना लगेचच महापालिका किं वा खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात असे. नंतर लक्षणे नसणारे, सौम्य, तीव्र लक्षणे नसणाऱ्यांना घरात स्वतंत्र खोली, काळजी घेण्यासाठी कोणी सदस्य असल्यास गृह विलगीकरणास परवानगी देण्यात आली. खासगी रुग्णांकडून आकारले जाणारे अवास्तव देयक, महापालिका रुग्णालयात खाटांची कमतरता अशा काही कारणास्तव त्रास

होत नसलेल्या रुग्णांनी घरातच विलगीकरण करून उपचार घेणे पसंत केले. रुग्ण आढळलेल्या घराचा परिसर प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावून आसपासच्या नागरिकांना खबरदारीचा संदेश दिला गेला. सध्या उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन आणि शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र व्यवस्था केली. विभागवार सहा वाहनांची उपलब्धता केली.

करोनाबाधितांच्या घरातील जैविक कचरा संकलित करताना र्निजतुकीकरण, कचरा प्रकल्पात तो स्वतंत्र ठेऊन शास्त्रीय पध्दतीने नष्ट करण्याची व्यवस्था केली गेली. मार्च महिन्यात ३५ किलो संकलित झालेल्या घरगुती जैविक कचऱ्याचे प्रमाण करोनाचा कहर सुरू असतानाच्या काळात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे ५५ हजार ७६५ आणि ६१ हजार ४४० किलोपर्यंत पोहोचला. ऑक्टोबरच्या १४ दिवसात २३ हजार ४०० किलो कचरा संकलीत करण्यात आला आहे.

घरगुती जैविक कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट न लागल्यास करोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे शासनाने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करून दिली आहे. महापालिकेने या कार्यपध्दतीनुसार आजवर एक लाख, ७४ हजार २७४ किलोग्रॅम म्हणजेच १७४.२७४ मेट्रिक टन घरगुती जैविक कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावल्याचे डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.

घरगुती जैविक कचऱ्याचा चढता आलेख

प्रारंभी तीन ते चार महिने गृहविलगीकरणास परवानगी नव्हती. नंतर ती देण्यात आली. यामुळे प्रारंभी घरगुती जैविक कचऱ्याचे प्रमाण कमी होते. नंतर करोनाबाधितांचा आकडा जसा वाढू लागला, गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या वाढू लागली, तसे घरगुती जैविक कचऱ्याचे प्रमाणही वाढले. मार्च महिन्यात ३५ किलो, एप्रिल महिन्यात २८९९, मेमध्ये २४२५, जून ६९६०, जुलै २१ हजार ३५०, ऑगस्टमध्ये ५५ हजार ७६५ आणि सप्टेंबरमध्ये ६१ हजार ४४० किलो कचरा संकलित करण्यात आला. ऑक्टोबरच्या १४ दिवसात २३ हजार ४०० किलो घरगुती कचरा संकलीत करण्यात आल्याचे डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.