लोकसता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरात उपचार घेणाऱ्या करोनाबाधितांची संख्या दोन हजारांनी कमी होऊन साडेचार हजापर्यंत आली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात सर्वात कमी मृत्युदर नाशिकचा आहे. सद्य:स्थिती अशी असली तरी गाफील राहता येणार नाही. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने महापालिका पूर्वतयारी करीत असून सुमारे १० हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन केले जात असल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. आरोग्य व्यवस्था भक्कम करण्याबरोबर दूरध्वनीवर वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन अर्थात ‘टेली मेडिसिन’ सुरू करण्याचा विचार सुरू आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर दिली जाणार असल्याचे यांनी सांगितले.

गुरुवारी जाधव यांनी ज्येष्ठ पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी त्यांनी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजना आणि उपचारांमुळे स्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाल्याचे नमूद केले.

चाचण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आली. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि विलगीकरण यावर लक्ष देण्यात आले. बाधित रुग्णांवर लगेच उपचार करण्यात आले. यामुळे रुग्णसंख्या कमी झाली, शिवाय मृत्युदरदेखील कमी झाल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले. आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आरोग्य, वैद्यकीय व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेच्या सोबत खासगी रुग्णालयातदेखील खाटांची संख्या वाढविण्यात आली. यामुळे आज व्हेंटिलेटर खाटाही रिक्त आहेत. बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणास प्राधान्य देत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

पुढील काळात दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत असल्याने गाफील राहता येणार नाही. नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात खाटा वाढविण्याचा विचार आहे. शहरात एकंदर १० हजार खाटांची व्यवस्था करण्याची तयारी केली जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. करोनाकाळात दूरध्वनीद्वारे चर्चा करून उपचार करण्याचा कल आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका दूरध्वनीवर आभासी पद्धतीने वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन व्यवस्था देण्याचा विचार करीत आहे. मनपाच्या संकेतस्थळावर करोना रुग्णालयातील खाटा, रिक्त खाटा आणि तत्सम माहिती दिली जात आहे.