उत्पन्न ३० टक्क्यांनी घटणार

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : करोनामुळे विविध क्षेत्रांतील आर्थिक घडी विस्कटली असून बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहे. या संकटाच्या आर्थिक परिणामांपासून महापालिकासारख्या संस्थादेखील दूर राहणार नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. करोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर साधारणत: २५ ते ३० टक्के परिणाम होणार आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली. करोनाकाळात महापालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने राबविलेल्या मुद्रांक शुल्कात सवलतीसारख्या काही योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. उत्पन्न ३० टक्क्यांनी घटणार असल्याने अनावश्यक कामांना कात्री लावणे अपरिहार्य ठरणार आहे. असे असले तरी सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. करोनामुळे अनेक महिने नागरिकांना टाळेबंदीत राहावे लागले. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा वेळी घरपट्टी, पाणीपट्टी सक्तीने वसूल करता येणार नाही. उपरोक्त विभागातील अधिकारी, कर्मचारी करोना कामात व्यस्त असल्याने वसुलीवर काही अंशी परिणाम झाला. उत्पन्नात येणारी घट लक्षात घेऊन आवश्यक नसलेली कामे तूर्तास बाजूला ठेवली जातील. नव्या भांडवली कामापेक्षा सध्याची काही कामे योग्य पद्धतीने केली जातील. शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्कात सवलतीच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्थावर मालमत्ता क्षेत्राला त्यामुळे चालना मिळाली. त्याच धर्तीवर, महापालिका सवलत योजना आखणार आहे. या संदर्भात शासनाशी विचारविनिमय केला जाईल.

पालिकेचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधला जाईल. उत्पन्न घटले तरी आवश्यक त्या बाबींसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. करोनाकाळात महापालिकेला वैद्यकीय मनुष्यबळाच्या तुटवडय़ाला तोंड द्यावे लागले. ही बाब लक्षात घेऊन बिटको रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध होतील. जुने बिटको रुग्णालय हे के वळ संसर्गजन्य आजारांसाठीच राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.