विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरात शाळा आणि ११ वीचे वर्ग बंद करावे लागले असताना दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरांचा आग्रह धरल्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयेदेखील धास्तावली आहेत. या शिबिरांमुळे प्रत्येक महाविद्यालयातील किमान १०० विद्यार्थी एकेका गावात जातील. गर्दी होईल. यातून करोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका असतानाही हा आग्रह धरण्यामागे विद्यापीठाचे अर्थकारण दडल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे.

पुणे विद्यापीठाने नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यतील महाविद्यालयांना विशेष शिबिराच्या आयोजनाबाबत ऑनलाइन प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे.

राष्ट्रीय सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणेच रासेयो विशेष शिबिरांचे आयोजन करणे क्रमप्राप्त असून या वर्षी आयोजनासाठी २० मार्चपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. त्याकरिता प्रत्येक रासेयो एककाकडून पाच मार्चपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर, दत्तक गावाची निवड करताना महाविद्यालयाचे शिबिरार्थी शारीरिक अंतर राखून आणि सुरक्षित निवास व्यवस्थेसाठी गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर सहभागी स्वयंसेवकांच्या पालकांकडून योग्य ते हमीपत्र घेण्यास विद्यापीठाने सुचवले आहे.

करोनाकाळात सार्वजनिक कार्यक्रम स्थगित, रद्द होण्याची मालिका सुरू असताना विद्यापीठाची कृती त्याविपरीत ठरली. या योजनेंतर्गत विद्यापीठाला प्रत्येक महाविद्यालयाच्या शिबिरासाठी एक लाख रुपयांचा निधी मिळतो. शिबिरांचे आयोजन न झाल्यास त्यावर पाणी फे रले जाईल हे लक्षात घेऊन शिबिरांचा फतवा काढला गेल्याची भावना उमटत आहे. यामुळे महाविद्यालयांना गर्दी होणाऱ्या शिबिरांच्या आयोजनास जुंपण्यात आल्याचे चित्र आहे.

विद्यापीठाची कारणे

करोनामुळे महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थितीबाबत प्रतिबंध आहेत. पण केंद्रशासित योजना असल्याने करोनाच्या पाश्र्वभूमीवर, अद्याप तरी विशेष शिबिरांबाबत कोणतीही सवलत वा नियमावलीत मुभा जाहीर झाली नसल्याने अध्यादेशानुसार रासेयो विद्यार्थ्यांना गुण प्रदान करणे अथवा राज्य, राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांसाठी नामनिर्देशन करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे अनिवार्य आहे. स्थानिक प्रशासन, शासनाच्या शिबिराच्या आयोजनाची तयारी करावी. आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमानुसार एका ठिकाणी १०० हून अधिक व्यक्ती एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी. २० मार्चपासून परीक्षा जाहीर होण्याची शक्यता असल्याने रासेयो एककासाठी २० मार्चपर्यंतचा कालावधी शिबिरांसाठी ठेवण्यात आला आहे.

धोका अन् अडचणी

रासेयोचे विशेष निवासी शिबीर सात दिवसांचे असते. दत्तक घेण्यासाठी संबंधित गावाची लेखी परवानगी बंधनकारक आहे. स्वयंसेवकाच्या पालकांचे संमतिपत्र घ्यावे लागणार आहे. महाविद्यालयांना १०० विद्यार्थ्यांना सात दिवस मुक्काम ठोकू देईल असे गाव शोधणे आणि जोडीला स्वयंसेवकांच्या पालकांचे हमीपत्र हेच मोठे आव्हान आहे. पालक परवानगी देतील, याची शाश्वती नाही. शिबिरात विद्यार्थिनी घरून ये-जा करतात. यामुळे दैनंदिन शहरातून त्यांचा ग्रामीण भागात प्रवास होईल. यात एखादा कुणी बाधित असला तरी शिबिरातील विद्यार्थी आणि ज्या गावात शिबीर होईल तेथील ग्रामस्थही बाधित होण्याचा धोका आहे.