महापालिकेतर्फे २० केंद्रांवर व्यवस्था

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणात महापालिकेने शहरातील सर्व भागातील ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्तांना घराजवळच्या केंद्रावर लस घेता येईल, याची व्यवस्था केली आहे. लसीकरण केंद्रांची संख्या हळूहळू विस्तारून आता २० वर नेण्यात आली असून दुसरीकडे लसीकरणात तांत्रिक अडचणी काही अंशी कायम आहेत. वैयक्तिक नोंदणी करणाऱ्यांना त्या भेडसावत नाहीत. परंतु, केंद्रावर नोंदणीसाठी गर्दी होते, ओटीपी उशिराने येतो, अशा तक्रारी आहेत.

पहिल्या टप्प्यात आरोग्य व्यवस्थेतील घटक, पोलीस, महसूल विभागातील कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले. त्यातील दुसरा डोस घेण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असताना मार्चच्या प्रारंभी ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्यांना करोना लसीकरणास सुरुवात झाली. प्रारंभी शहरात नियोजन झालेले नव्हते. काही मोजक्याच केंद्रांवर ही व्यवस्था करण्यात आली. हळूहळू या केंद्रांची संख्या वाढविली गेली. आता २० ठिकाणी महापालिकेची लसीकरण केंद्र कार्यान्वित झाली असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी प्रथम नोंदणी करावयाची आहे. नोंदणीची व्यवस्था झाली असली तरी काही ठिकाणी त्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून येते. नोंदणीची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी ओटीपी लवकर येत नसल्याचे नागरिक सांगतात. वैयक्तिक पातळीवर नोंदणी करणाऱ्यांना अडचण येत नाही. काही तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता लसीकरणाची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू झाल्याचे डॉ. नागरगोजे यांनी नमूद केले. शहरात महापालिकेची २० आणि खासगी १६ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शासनाकडून नव्या केंद्रांना जशी मान्यता येईल, तशी यामध्ये वाढ होणार आहे. केंद्रांची रचना करताना ज्येष्ठांना लसीकरणासाठी दूरवर जावे लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली. सर्व भागात किमान एक केंद्र राहील याचे नियोजन करण्यात आले असल्याने लस घेण्यासाठीची दमछाक कमी होणार आहे.

विभागनिहाय केंद्र

शहरात महापालिकेच्या वतीने सातपूर येथील इएसआयएस रुग्णालय, रविवार कारंजा येथील रेडक्रॉस, पंचवटीतील मायको, रामवाडी, उपनगर, सिडको, पिंपळगाव खांब, वडाळा गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिकरोड येथील जेडीसी बिटको, इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय, गंगापूर रुग्णालय, अंबड, मखमलाबाद, भारतनगर, दसक पंचक, एमएचबी कॉलनी, मायको सातपूर, सिन्नर फाटा, जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.