मनपासह जिल्हा रुग्णालय, परिषदेचा उपक्रम

नाशिक : करोना आणि करोनाग्रस्त रुग्ण या शब्दांशी सर्वसामान्यांची ओळख झाली असली तरी अद्याप या आजाराविषयी नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. या भीतीचे रूपांतर आजारात होत असून रुग्णसंख्येत वेगवेगळ्या पद्धतीने वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद या त्रिस्तरावर या भीतीवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

शहरात करोनाग्रस्त रुग्णांनी २० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या मोठी आहे. तीन महिन्यांहून अधिक काळापासून करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याच वेगात आजाराची भीती पसरत आहे. वास्तविक योग्य खबरदारी घेतल्यास या आजाराचा संसर्ग आणि रुग्णसंख्येवर मात करता येऊ शकते. परंतु, समाज माध्यम, दूरचित्रवाहिन्यांमधून सातत्याने होणारे वार्ताकन पाहता नागरिकांच्या मनात या आजाराविषयी भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्ण व्यवस्थेने केलेल्या सोयी सुविधांपासून नाराज आहेत. आपल्यावर योग्य उपचार होत नसल्याची काहींची तक्रार आहे.

या सर्व पाश्र्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालये, जिल्हा परिषद आणि नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्रपणे करोनाग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच सर्वसामान्य नागरिक यांना करोनाविषयी माहिती देण्यासाठी समुपदेशनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणारे समुपदेशक सध्या करोना कक्ष तसेच करोना संशयितांच्या कक्षात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत.  आजार कसा बरा होईल, रुग्णसेवेत काही अडचणी आहेत, याविषयी संवाद साधण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने ‘ई-साय क्लिनिक’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून करोनाला मानसिकदृष्टय़ा तोंड देताना करोनाग्रस्त रुग्ण मानसिक निरोगी कसा राहील, यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये २४ तास समुपदेशनासाठी ७३०३२५०५१५ हा मदतवाहिनी क्रमांक देण्यात आला आहे.

तसेच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक सायकॅट्रिक सोसायटी तसेच भोसला कॅम्पसच्या सहकार्याने मनोधार उपक्रम हाती घेतला आहे. करोना काळातील ताण, चिंता, झोप न येणे, निराश वाटणे, आयुष्य संपवण्याची इच्छा अशा काही नकारात्मक विचारांवर समुपदेशन करण्यात येत आहे. यासाठी ९६०७५३२२३३, ९६०७७३५१३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

भीती खूप, पण बोलण्यास कोणी तयार नाही

करोनाविषयी लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. करोना झाला म्हणजे आयुष्य संपले असा गैरसमज आहे. वास्तविक ज्यांना जुन्या व्याधी, मधुमेह, रक्तदाब अशा समस्या आहेत त्यांना करोनाचा धोका आहे. योग्य काळजी घेतल्यास आजार बराही होतो. परंतु, बातम्या, समाज माध्यमांवर येणाऱ्या चित्रफिती पाहून या आजाराचा धसका घेत कोणीही बोलायला तयार नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केलेल्या करोनाग्रस्त, करोना संशयित असलेल्या सहा ते सात हजार रुग्णांशी संपर्क करून या आजाराविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. मोजक्या काही मंडळींनी मोकळा संवाद साधला. फारसे कोणी बोलायला तयार नाही.

– डॉ. नीलेश जेजूरकर, मानसोपचारतज्ज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय