विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. अंबड येथील वेअर हाऊसमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी शुक्रवारी मतदान झाले होते. नाशिक विभागात ५५ टक्के तर नाशिक जिल्ह्यात ४८ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारीका-ऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. त्यांच्या नियंत्रणात प्रत्येकी ६ याप्रमाणे ३० टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच परिसरात गर्दी केली. दुपारच्या रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांमधील हा उत्साह काहीसा मंदावला.

निवडणुकीसाठी मशीन न वापरता पारंपरिक पद्धतीने मतदानाची चिठ्ठी पद्धत निवडणूक आयोग वापरत असल्याने, तसेच उमेदवारांची वाढलेली संख्या, पसंती क्रमानुसार मत मोजणी या पद्धतीमुळे आज मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी सुरू राहील. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागण्याची शक्यता आहे.