५४८ रुग्णांची करोनावर मात, ४२ जणांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी करोनाचे पुन्हा तीन नवीन रुग्ण आढळले. यातील एक रुग्ण नाशिकरोड येथील तर दोन मालेगावचे आहेत. आतापर्यंत जिल्ह्य़ात करोनाचे ७९९ रुग्ण आढळले. त्यातील ५४८ उपचाराअंती करोनामुक्त झाले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला. सध्या २१९ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नाशिकरोड येथील रुग्ण रेल्वेत नोकरीला आहे. कामानिमित्त त्याचे भुसावळला येणे-जाणे असल्याचा इतिहास आहे. सोमवारी दुपारी ५९ अहवाल प्राप्त झाले. त्यात ५४ अहवाल नकारात्मक तर तीन अहवाल सकारात्मक होते. दोन अहवाल अनिर्णित आहेत. करोनाबाधित रुग्णांमध्ये नाशिकरोड येथील ५३ वर्षीय व्यक्ती,

मालेगाव येथील ५१ आणि मालेगावच्या लिटिल एंजल स्कूल येथील २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे. नाशिकरोड येथील बाधित रुग्ण रेल्वेत कर्मचारी आहे. संबंधिताचे भुसावळला जाणे-येणे झाले. याच काळात त्याला प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. संबंधिताच्या निवासस्थानाभोवतीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्याची तयारी पालिका प्रशासनाने हाती घेतली. दुसरीकडे जनरल वैद्यनगरमधील प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटविण्यात आले असून या क्षेत्राचा १४ दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्याने निर्बंध हटविण्यात आल्याचे पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. आतापर्यंत मालेगाव महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६१९ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात १०३ तर नाशिक महापालिका क्षेत्रात ४७ रुग्ण आढळले. तीन-चार दिवसांत रुग्ण सकारात्मक येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मध्यंतरीच्या काळात सौम्य लक्षणे असणारे आणि लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्याच्या नियमात बदल झाला.

यामुळे रुग्णालयातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ५४८ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यांना घरी पाठविण्यात आले.

ग्रामीण भागांतही शिरकाव

ग्रामीण भागात आतापर्यंत १०३ जणांना करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.  यामध्ये येवल्यात सर्वाधिक म्हणजे ३३ रुग्ण आढळले. त्यातील काही रुग्णांचा मालेगावशी संपर्क आल्याचा इतिहास आहे. दाट लोकवस्तीच्या मालेगाव शहरात करोना वेगाने पसरला. पण, विरळ लोकवस्तीच्या ग्रामीण भागात तो हातपाय पसरत आहे. नाशिक तालुक्यात नऊ, चांदवड चार, सिन्नर आठ, दिंडोरी नऊ, निफाड १५, नांदगाव सहा, सटाणा दोन, मालेगाव ग्रामीण १६ अशी ही रुग्णसंख्या आहे. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या आदिवासीबहुल भागासह देवळा तालुका करोनामुक्त आहे.