नाशिक : शहराची रुग्णसंख्या सहा हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ दिवसांवर आला आहे. याआधी तो १४ दिवस होता. सिडको विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १० दिवस तर नाशिक पूर्व विभागात तो २० दिवस आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात करोनामुळे आतापर्यंत ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत २८५३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

शहर आणि ग्रामीण भागात करोनाचा वेगाने फैलाव होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी त्याबाबत माहिती दिली. जिल्ह्य़ात आतापर्यत करोनाचे नऊ हजार ८४१ रुग्ण आढळले. त्यापैकी उपचाराअंती सहा हजार ५९० जणांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्थितीत नाशिक शहरात सर्वाधिक १७३७ रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण एक हजार १२ इतके आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात ८४ रुग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

करोनामुळे आतापर्यंत ३९८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहरातील २१०, नाशिक ग्रामीण ९०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातील ८२ आणि जिल्ह्य़ाबाहेरील १६ रुग्णांचा समावेश आहे. मागील आठवडय़ात नाशिक शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवस होता. मागील दोन-तीन दिवसांत जलद प्रतिजन चाचण्यांमुळे बाधितांची आकडेवारी वेगाने वाढत आहे.

या स्थितीत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत एक दिवसाने वाढ होऊन तो १५ वर पोहोचला. विभागनिहाय विचार केल्यास सिडको विभागात १० दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. तर पूर्व विभागात हा कालावधी दुप्पट म्हणजे २० दिवस इतका आहे. मागील काही दिवसात नाशिकरोड भागात करोनाचा आलेख वेगाने उंचावला. या भागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १३ दिवस आहे. पंचवटी विभागात १५ दिवस, सातपूर विभागात १४ आणि नाशिक पश्चिम विभागात १६ दिवस हा कालावधी असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

पंचवटी विभागात सर्वाधिक रुग्ण

करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पंचवटी विभागात झाला असून या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक १६९१ रुग्ण आढळले. दाट लोकवस्तीच्या भागात वेगाने संसर्ग पसरला. पंचवटी खालोखाल नाशिक पूर्व विभागाचा समावेश असून तिथे १४८८ रुग्ण आढळले. नाशिकरोड विभागात ८९८, सिडको विभागात ८१४, नाशिक पश्चिम ५६९ आणि सातपूर विभागात ४२५ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांमध्ये ५९ टक्के पुरुष तर ४१ टक्के महिला आहेत. तरुण वर्गात करोनाचा आधिक्याने प्रसार होत आहे. गर्दीच्या ठिकाणी भ्रमंती, सुरक्षित अंतर न राखणे, मुखपट्टी, हातांची स्वच्छता याकडे दुर्लक्ष होत असल्याने या वयोगटात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते.