News Flash

Coronavirus : शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांवर

सरासरी प्रतिदिन १०० ते १२५ ने नव्या रुग्णांची पडणारी भर आता २०० वर पोहचली आहे.

संग्रहित छायाचित्र

नाशिक : शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांवर आला असून  अवघ्या १५ दिवसात रुग्णसंख्येत १७०२ ची वाढ झाली आहे. सरासरी प्रतिदिन १०० ते १२५ ने नव्या रुग्णांची पडणारी भर आता २०० वर पोहचली आहे. २३ जूनपर्यंत शहरात करोनाचे १३७२ रुग्ण होते. सात जुलै रोजी ही संख्या तीन हजारपार गेली आहे. नाशिकरोड विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सहा दिवसांवर आला आहे. उपचाराअंती दीड हजार रुग्णांना घरी सोडण्यात आले असून सध्या दीड हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टाळेबंदीचे निर्बंध शिथील झाल्यानंतर बाजारपेठांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्यास सुरूवात झाली. त्याची परिणती रुग्णसंख्येचा आलेख उंचावण्यात झाली आहे. सुरक्षित अंतर, मुखपट्टीच्या नियमाकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. गर्दीत न जाण्याची खबरदारी घेतली गेली नाही. ही बाब करोनाचा आलेख वेगाने उंचावण्यास कारक ठरली. करोनाचा प्रादुर्भाव कसा वाढत आहे, हे आकडेवारीवरून लक्षात येते. शहरात करोनाचा पहिला रुग्ण नऊ एप्रिल रोजी आढळून आला होता. महिनाभरात ही संख्या २० वर पोहचली. पुढील १३ दिवसात म्हणजे १८ मे रोजी एकूण रुग्णसंख्या ८७ होती. मेच्या अखेरीस शहराची आकडेवारी ३३९ वर पोहचली. जून महिन्यात करोनाचा उद्रेक झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. टाळेबंदीचे निर्बंध जसे काहीअंशी शिथील झाले, तसेच या महिन्यात रुग्ण झपाटय़ाने वाढले. दाट लोकवस्तीच्या भागात करोनाचा समूह पातळीवर संसर्ग सुरू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या महिन्याच्या मध्यानंतर रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. दररोज १०० ते १५० रुग्णांची भर पडल्याने महिना अखेरीस ही आकडेवारी दोन हजाराच्या जवळपास जाऊन पोहोचली. याची परिणती जुलै महिन्यातील सध्याच्या स्थितीत झाली आहे. सात दिवसात शहरात नव्या हजार रुग्णांची भर पडली आहे.

नाशिकरोडमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सहा दिवसांवर

नाशिकरोड विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या सहा दिवसांवर आला आहे. पंचवटी विभागात आतापर्यंत ८९२ रुग्ण आढळले. यासह सातपूर, नाशिक पश्चिम आणि सिडको विभागात १२ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. नाशिक पूर्वमध्ये हा कालावधी १३ दिवसांचा असल्याचे महापालिका सांगते. सद्य:स्थितीत सातपूर विभागात २११, सिडको विभागात २९८, नाशिक पश्चिममध्ये २९९, नाशिकरोडमध्ये ३६५, पंचवटीत ८९२ आणि नाशिक पूर्वमध्ये सर्वाधिक ९८५ रुग्ण आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 3:43 am

Web Title: covid doubling rate in nashik city at 12 days zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक आणि पालकांच्या समस्यांमध्ये भर
2 शारीरिक अंतरपथ्याकडे होणारे दुर्लक्ष मालेगावकरांसाठी धोकादायक
3 सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार
Just Now!
X